फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:17 AM2021-02-17T04:17:13+5:302021-02-17T04:17:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उरुळी कांचन : कर्जाचा हप्ता भरण्यासाठी एका फायनायन्स कंपनीच्या अधिकाऱ्याने तगादा लावल्याने कर्जदाराने अधिकाऱ्यावर कोयत्याच्या साह्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन : कर्जाचा हप्ता भरण्यासाठी एका फायनायन्स कंपनीच्या अधिकाऱ्याने तगादा लावल्याने कर्जदाराने अधिकाऱ्यावर कोयत्याच्या साह्याने वार करून त्यांचा कार्यालयातच खून केल्याची धक्कादायक घटना उरूळी कांचन येथे मंगळवारी घडली. उरुळी कांचन-जेजुरी रस्त्यावरील सौरभ कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर बाल्कनीत ही घटना घडली.
रवींद्र प्रकाश वळकुंडे (वय २३, मूळ रा. अकलूज, जि. सोलापूर, सध्या रा. नक्षत्र सोसायटी, उरुळी कांचन) असे खून झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तर राहुल लक्ष्मण गाढवे (वय २९, मूळ रा. देवळगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. टायरपाटी, चंदनवाडी, बोरीभडक, ता. दौंड, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल लक्ष्मण गाढवे हा ट्रक ड्रायव्हर आहे. त्याने खासगी फायनान्स कंपनीकडून ९८ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. गाढवे याने या कर्जाचा एक हप्ता भरला होता व दुसऱ्या हप्त्याच्या वसुलीसाठी खासगी फायनान्स कंपनीचे वैयक्तिक कर्ज विभाग प्रमुख रवींद्र प्रकाश वळकुंडे यांनी त्याच्याकडे तो भरण्यासाठी तगादा लावला होता. त्याचा राग आल्याने मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान राहुल गाढवे हा खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गेला. हप्ता भरण्यासंदर्भात दोघे बोलत बाल्कनीत आले. यावेळी गाढवे याने कोयत्याने वळकुंडे यांच्या मानेवर सपासप वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने वळकुंडे यांचा मृत्यू झाला. ही घटना खासगी फायनान्स कंपनीच्या अन्य कर्मचाऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देत वळकुंडे यांना त्याच बिल्डिंगमध्ये असलेल्या खासगी रुग्णालयात हलवले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी राहुल लक्ष्मण गाढवे याला अटक करण्यात आली आहे.
फोटो :- मयत रवींद्र प्रकाश वळकुंडे