जेवणाच्या ताटात हात घातला म्हणून खून; नियोजनपूर्वक खून केला आहे का? पोलिसांचा तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 02:11 PM2024-10-15T14:11:59+5:302024-10-15T14:12:45+5:30
धायरीतील तरुणाच्या खून प्रकरणात आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असून आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे
पुणे : तरुणाचा खून प्रकरणात आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असून, त्यांनी नियोजनपूर्वक खून केला आहे का, त्यामागे उद्देश काय होता, तसेच अन्य कोणाचा सहभाग आहे का?, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनीन्यायालयात सांगितले. दरम्यान, दारू प्यायल्यानंतर जेवणाच्या ताटात हात घातल्याने झालेल्या वादातून धायरी रस्त्यावर तरुणाला बांबू व दगडाने मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
आदित्य संतोष घोरपडे (वय २३, रा. गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश उर्फ नन्या राकेश शुक्ला उर्फ परदेशी (वय ३२), जगदीश राकेश शुक्ला (वय २१) आणि रोहन उर्फ मारी राजू शेळके (वय २५, तिघे रा. धायरी) यांना पोलिस कोठडी झाली आहे. तर, या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बाल निरीक्षणगृहात करण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने दिले आहेत. मृत तरुणाच्या आईने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वाच्या सुमारास धायरी रस्त्यावरील लाडली साडी सेंटरच्या जवळ त्रिमूर्ती किराणा मालाच्या दुकानासमोर घडली. या प्रकरणात पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. आरोपींनी खून करण्यासाठी वापरलेली रिक्षा कोठे लपवून ठेवली आहे, तसेच, मारहाण करण्यासाठी बांबू कोठून आणले, याबाबत चौकशी करायची आहे आणि न्यायवैद्यक पुरावे गोळा करायचे आहेत. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी अतुल भोस आणि सहायक सरकारी वकील बोधिनी शशिकला यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.