डिंग्रजवाडीत मित्राचा खून करणारा पाच तासांत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:31+5:302021-04-29T04:08:31+5:30
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) गावच्या हद्दीमध्ये लालदेव ऊर्फ लालसिंग बिरीश मांझी या ४० वर्षीय इसमाचा २८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास ...
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) गावच्या हद्दीमध्ये लालदेव ऊर्फ लालसिंग बिरीश मांझी या ४० वर्षीय इसमाचा २८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे व शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपी शिवराज बंडूराव घंटे यास पाच तासांतच जेरबंद केले. सणसवाडीचे पोलीस पाटील दत्तात्रय माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माहिती मिळताच घटनास्थळी दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवून दिला. पथकाने मृत इसमाचे नाव लालदेव ऊर्फ लालसिंग बिरीश मांझी (रा. साठेवस्ती सणसवाडी ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. म्हसारी, ता. संपाचक, जि. पटना, राज्य बिहार) असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर या इसमाचे बांधकामाचे बिगारी काम करत असताना शिवराज घंटे या कामगारासोबत वाद झाला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर कामाच्या ठिकाणी जात शिवराज याला ताब्यात घेत चौकशी केली. कामातून झालेल्या वादातून मित्र असलेला लालदेव ऊर्फ लालसिंग याला दारू पाजून हाताने मारहाण करून जमिनीवर पाडून डोक्यात दगड घालून खून केला असल्याची कबुली दिली. या वेळी पोलीस पथकाने शिवराज बंडूराव घंटे (रा. सोनाईमळा सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. हंगरगा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यास अटक केली व त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला अटक करणारे पोलीस पथक व आरोपी.