राजगुरूनगर: दारूच्या नशेत मित्रांनीच केली तरूणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:44 PM2021-12-16T12:44:10+5:302021-12-16T12:53:51+5:30
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल थिटे यांनी या घटनेची खेड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे
राजगुरूनगर: दारुच्या नशेत मित्रांनी मित्राचा खून केल्याची घटना खरपुडी बुद्रुक (ता. खेड ) येथे घडली आहे. तसेच या घटनेत दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. रामदास सोपान थिटे (वय २७ , रा. सडकवस्ती रेटवडी ता. खेड ) असे खुन झालेल्या तरुणाचे नांव आहे. ही घटना बुधवारी रात्री (दि. १५ ) घडली.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल थिटे यांनी या घटनेची खेड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीला नातलगाकडून माहिती मिळाली की, कनेरसर ते खेड मार्गावरील खरपुडी बुद्रुक येथे हॉटेल माथेरान गारवा जवळ रस्त्यावर माझा चुलत भाऊ रामदास सोपान थिटे व दत्तात्रय रामदास टाकळकर हे गंभीर जखमी अवस्थेत पडले असल्याचे सांगितले. फिर्यादी इतर नातलगासह घटनास्थळी गेले असता, दोघेही जखमी व बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांच्या जवळ दुचाकी मोटारसायकल व काचेची फुटलेली बाटली दिसून आली.
दोन्ही जखमींना खेड पोलिसाच्या मदतीने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी रामदास थिटे यांचा मुत्यू झाला असल्याचे सांगितले. तर दत्तात्रय टाकळकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला फारसे बोलता येत नव्हते. या प्रकरणी खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असुन संबधित हॉटेलमध्ये अज्ञात कारणावरून मित्रांमध्ये भांडण होऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने रामदास थिटे यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जागीच मुत्यू झाला. पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव करित आहे.