वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या- अॅड. प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 01:33 AM2018-10-22T01:33:31+5:302018-10-22T15:15:44+5:30
वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे.
जेजुरी : वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे. हिटलरशाही आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. वंचित समाजाने वेळीच सावध होऊन एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. येथील पालखी तळावर समस्त धनगर समाज व बहुजन समाजाच्या वतीने जेजुरीत जेजुरीगड दसरा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला भारिपचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले होते. महामेळाव्याला राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले होते.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनुवादी विचारसरणी बहुजनांचा विचार करूच शकत नाही.
बहुजनांवर वर्चस्व टिकवण्यासाठीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत. जातीजातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. याचबरोबर राज्यातील बहुजनवर्ग दुष्काळात होरपळतोय पण त्यांना दुष्काळ जाहीर करावयाचा नाही.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी बारामतीच्या मेळाव्यात सत्तेत आल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना आता या आश्वासनाचा विसर पडला आहे. आरक्षणाचे भूत खेळवत ठेवले जात आहे. राज्यातील संविधानप्रेमींनी एकाच व्यासपीठावर यायला हवे तरच परिवर्तन होईल.
यशवंत क्रांती सेनेचे अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी जेजुरीत जेजुरीगड दसरा महामेळावयाचे आयोजन केले होते. यावेळी राज्यभरातील धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यभरातून आलेले धनगर व बहुजन एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी वंचितांची सत्ता आणण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.