एका'चप्पल'मुळे उघडकीस आला ३ वर्षाच्या चिमुकल्याचा खून; मार्केटयार्ड येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:52 PM2021-05-06T18:52:24+5:302021-05-06T18:53:10+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पाण्यात बुडवून मावशीनेच केला होता 3 वर्षांच्या भाच्याचा खून.....
पुणे : ‘माय मरो, पण मावशी जगो’ अशी मराठी म्हण आहे. मात्र, त्याच्या नेमका विरुद्ध प्रकार मार्केटयार्ड येथे घडला आहे. मावशीनेच आपल्या ३ वर्षाच्या भाच्याचा पाण्यात बुडवून खुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी निर्मला कैलास वर्मा (रा. लेबर कॅम्प, मार्केटयार्ड) या महिलेला अटक केली आहे. मृत्यु झालेल्या मुलाच्या चप्पलचा जोड वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याचे पोलिसांच्या मनातील पाल चुकचुकली व त्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला.
चाकेन अवधेश वर्मा (वय ३) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अवधेश धनीराम वर्मा (वय २७, रा. मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १ मे रोजी मार्केटयार्ड परिसरातील बांधकाम साईटवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती.
युनी इंडिया वास्तू कंपनीचे मार्केटयार्ड येथे बांधकाम सुरु आहे. १ मे रोजी इमारतीमध्ये लिफ्टसाठी ठेवलेल्या जागेतील पाण्यात एका ३ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे सर्व बांधकाम मजुर असल्याने मुलगा खेळत खेळत गेला असावा व त्यातून तो पाण्यात पडून त्याचा मृत्यु झाला असावा, असे प्राथमिक बाबीवरुन दिसून येत होते.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा एक बाब लक्षात आली. मुलाची एक चप्पल घटनेच्या ठिकाणी तर दुसरी लांब पडलेली आढळून आली. या मुद्दयाकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा निर्मला वर्मा ही इमारती जात असताना तिच्या मागोमाग चाकेन हा मुलगा जात असल्याचे दिसून आले. काही वेळाने ही बाहेर आली. पण, मुलगा बाहेर आला नाही. पोलिसांनी बांधकाम मजुरांकडे चौकशी केल्यावर फिर्यादीच्या घराच्यांच्या बाबतीत चारित्र्यावरुन संशय घेत होती. त्यावरुन त्यांच्यात भांडणे झाल्याची माहिती समोर आली.
त्यामुळे पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे व त्यांच्या सहकार्यांनी निर्मला हिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्यानंतर तिने आपण रागाच्या भरात चाकेन याला उचलून घेऊन लिफ्टच्या खड्डयातील पाण्यात टाकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली आहे. घटनास्थळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या चप्पलेवरुन पोलिसांनी हा खरा प्रकार शोधून काढला.