दारू पिण्याच्या वादातून खडकी बाजारमध्ये तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 10:02 AM2019-03-14T10:02:06+5:302019-03-14T10:53:44+5:30
लष्कर अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यामध्ये दारू पिण्यावरुन झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्याची घटना समोर आली आहे.
पुणे - लष्कर अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यामध्ये दारू पिण्यावरुन झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्याची घटना समोर आली आहे. गोपाळ अर्जुन कांबळे (29) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
राजेश राजू स्वामी, सागर अशोक उंबरकर, धिरज गवळी, रेणुका परदेशी आणि राधा राजू स्वामी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे असून पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना खडकी बाजारमधील बंगला नंबर 23 येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी असलेल्या बंगल्यात हे सर्व जण जमले होते. त्यांच्यात दारू पिण्यावरुन वाद झाला. त्यात या पाच जणांनी चिडून गोपाळ कांबळे याला मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातला व हत्याराने त्याच्यावर वार केले. गोपाळ याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यावर खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. इतर तिघे पळून गेले असून अधिक तपास खडकी पोलीस करीत आहेत.