Pune Crime | दारुच्या वादातून गळा कापून सहकाऱ्याचा केला खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 08:05 AM2022-05-25T08:05:47+5:302022-05-25T08:06:21+5:30
समर्थ पोलिसांनी या खुनाचा छडा अवघ्या ६ तासांत लावला...
पुणे : दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी आपल्याच सहकाऱ्याचा गळा कापून खून केल्याची घटना जुनी जिल्हा परिषदेसमोरील सार्वजनिक स्वच्छता गृहासमोरील फुटपाथवर मंगळवारी सकाळी उघडकीस आली. समर्थ पोलिसांनी या खुनाचा छडा अवघ्या ६ तासात लावून दोघांना अटक केली.
प्रभात कुमार कमलाकर म्हस्के (वय ३६, रा. सोलापूर), नीलेश बाळासाहेब भोसले (वय २५, रा, वेल्हे, शिवापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रभात कुमार याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. तर संजय असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय, नीलेश व प्रभात कुमार हे तिघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तिघे मिळेल ती कामे करून फुटपाथवर राहतात. सोमवारी प्रभात कुमार याला केटरींगच्या कामाचे १६०० रुपये मिळाले होते. तिघांनी एकत्र येऊन सोमवारी रात्री १० वाजता मद्यप्राशन केले. संजय याने पुन्हा दारू पाजण्याचा आग्रह केल्यामुळे परत मद्यप्राशन केले. त्यानंतर तिघे रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. संजय याने प्रभात कुमार याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र पैसे संपल्यामुळे त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेेळी त्यांच्यात वाद झाला. त्यातून दोघांनी संजय याच्या गळा छोट्या चाकूने कापला. खून केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता.
फुटपाथवर पडलेल्या मृतदेहाची माहिती मंगळवारी सकाळी पोलिसांना मिळाली. खून झालेला व्यक्ती अज्ञात होता. पोलिसांसमोर मृत व्यक्तीची ओळख पटविण्याबरोबरच आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान होते. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, मृत व्यक्ती व दोघे आरोपी एकत्र जात असल्याचे दिसून आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक संदीप जोरे, कर्मचारी सुशील लोणकर, संतोष काळे, नीलेश साबळे, हेमंत पेरणे यांच्या पथकाने दोघांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी चाकूने गळा कापून खून केल्याची माहिती दिली.