पुण्यात भरदिवसा सिमेंटची विट डोक्यात घालून दारू दुकानाच्या व्यवस्थापकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:32 PM2022-04-16T18:32:24+5:302022-04-16T18:34:57+5:30
आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
धायरी: सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी दारू दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या इसमाच्या डोक्यात सिमेंटची विट घालून खून केल्याची घटना घडली आहे. दिनकर सूर्यभान कोटमाळे (वय :४०, रा. चरवड वस्ती, वडगाव पठार, पुणे) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील शरद हॉस्पिटलच्या मागे प्रयेजा सिटी रस्त्यालगत असणाऱ्या देशी दारूच्या दुकानात घडली. याप्रकरणी तौशिब रफिक शेख (वय: २४, मारुती मंदिरामागे, आनंदनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) याला सिंहगड रस्ता पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील शरद हॉस्पिटलच्या मागे रामदास घुले व अरुण घुले यांचे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात दिनकर कोटमाळे हे व्यवस्थापक म्हणून काम करीत असत. आज शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी तौशिब शेख हा दारू पिण्यासाठी दुकानात आला असता त्याचे व्यवस्थापक दिनकर कोटमाळे यांच्याशी वाद झाले. या वादातून आरोपीने तेथे असणारी सिमेंटची विट त्यांच्या डोक्यात घातली. तसेच गळा दाबला असल्याचीही प्राथमिक माहिती मिळत आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच सिंहगड रस्ता पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीस तत्काळ ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली.