Pune Crime: प्रेमसंबंधातून महिलेचे डोके भिंतीवर आपटून केला खून; अंगावरील दागिनेही चोरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 15:37 IST2022-04-11T15:37:08+5:302022-04-11T15:37:15+5:30
अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन तो पळून गेला होता

Pune Crime: प्रेमसंबंधातून महिलेचे डोके भिंतीवर आपटून केला खून; अंगावरील दागिनेही चोरले
पुणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादात महिलेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्यानंतर तिच्या अंगावरील दागिने, मोबाईल चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
किसन सिताराम जगताप (वय ४६, रा. नारळीचा मळा, ता. पुरंदर, जि़ पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुनिता बाळु कदम (वय ४४, रा. वैदुवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी सुनिता कदम हिच्या विवाहित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता कदम या आपली मुलगी व जावई यांच्यासह वैदुवाडी येथे राहत होत्या. त्याचे किसन जगताप याच्याशी प्रेमसंबंध होते. या कारणावरुन त्यांच्यात शनिवारी रात्री वाद झाला. तेव्हा किसन जगताप याने सुनिता कदम यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यात सुनिता यांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्याने सुनिता कदम यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन तो पळून गेला. हा प्रकार फिर्यादी यांना रविवारी सकाळी पावणेनऊ वाजता लक्षात आला. त्यांनी हडपसर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी किसन जगताप याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे अधिक तपास करीत आहेत.