Pune Crime: विश्रांतवाडीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 09:09 IST2022-07-07T09:09:07+5:302022-07-07T09:09:16+5:30
विश्रांतवाडी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले

Pune Crime: विश्रांतवाडीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून
येरवडा : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना बुधवारी रात्री विश्रांतवाडी येथे घडली. या घटनेत तुषार जयवंत भोसले (वय 28, रा. दांडेकर पूल, पुणे ) याचा खून करण्यात आला असून याप्रकरणी विश्रांतवाडीपोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तुषार याच्यावर येरवडा तसेच दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे शरीरा विरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे समजते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हा पूर्वी त्याच्या मामाकडे विश्रांतवाडी येथे राहत होता. या ठिकाणी त्याचे काही दिवसांपूर्वी भांडण झालेले होते. बुधवारी सायंकाळी तो विश्रांतवाडी येथील वडारवस्ती येथे आल्यानंतर जुन्या भांडणातून पुन्हा वाद झाला. यामध्ये त्याला पोटात चाकूने भोसकून गंभीर जखमी करण्यात आले. उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी तात्काळ विश्रांतवाडी पोलिसांनी धाव घेऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते करीत आहेत.