अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून; पोटाला खांबाचा तुकडा बांधून मृतदेह फेकला नदीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 04:38 PM2022-06-15T16:38:18+5:302022-06-15T16:38:27+5:30
आरोपींनी गावातील महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत तरुणावर पाळत ठेवली होती
पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून करुन मृतदेह निरा नदीत फेकून दिल्याची घटना वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी संशयित पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विकास संभाजी पाखरे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे हात व पाय बांधून व पोटाला सिमेंटच्या खांबाचा तुकडा बांधून कुरवली येथे नीरा नदीत फेकून दिल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी संशयित आरोपी नवनाथ श्रीधर नवले सचिन श्रीधर नवले दोघेही (रा. दगड,अकोले,ता.अकोले,जि.सोलापूर) महेंद्र आटोळे (रा. सावळ,ता.बारामती,जि.पुणे) दादा हगारे (रा.पोंदवडी,ता. इंदापूर जि.पुणे ) साधना नवनाथ नवले (रा.दगड,अकोले ता.माढा,जि.सोलापूर ) या पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयताचे भाऊ सचिन संभाजी पाखरे,वय.३३ वर्षे ( रा.करकंभ बादलकोट,ता.पंढरपूर,जि.सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील करकंब जवळील बादलकोट येथील विकास संभाजी पाखरे या युवकाचा खून झाला आहे. हा युवक पशुखाद्याच्या वाहतुकीच काम करत होता. यातील पाचही आरोपींनी गावातील महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत त्याच्यावरती पाळत ठेवली होती. दहा जुनला पाच जणांनी संगनमताने त्याचा खून केला. आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे हातपाय बांधून पोटाला सिमेंटच्या खांबाचा तुकडा बांधून नीरा नदीच्या पाण्यात फेकून दिले. विकास पाखरेची बॉडी नागरिकांना दिसल्यानंतर लोकांनी वालचंदनगर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हा मृतदेह बाहेर काढत त्याची ओळख पटवून अवघ्या दोन दिवसात या खूनाचा छडा लावून ५ आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे हे करीत आहेत.
या कारवाईत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातूरे,सहाय्यक फौजदार अतुल खंदारे, शिवाजी निकम, पोलीस कर्मचारी रवींद्र पाटील, प्रमोद भोसले,अजित थोरात यांनी सहकार्य केले.