तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून; कॅबचालकाला २४ तासात पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 12:45 PM2023-05-15T12:45:19+5:302023-05-15T12:45:33+5:30

दोघांची ओळख झाल्यावर अभियंत्याने कॅबचालकाकडून ३ हजार घेतले होते

Murder of computer engineer for three thousand rupees The cab driver was caught within 24 hours | तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून; कॅबचालकाला २४ तासात पकडला

तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून; कॅबचालकाला २४ तासात पकडला

googlenewsNext

पुणे : नगर रस्त्यावरील वाघोलीत मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी झालेल्या संगणक अभियंत्याच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मोटारचालकाने तीन हजार रुपयांसाठी तरुणाचा गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी २४ तासांत गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपी भगवान केंद्रे (वय २३, रा. परतापूर, ता. कळंब, जि. धाराशिव) याला अटक केली. त्याचा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

गौरव सुरेश उरावी (वय ३५, रा. खराडी, मूळ रा. शिवाजीनगर, अमरावती) असे खून झालेल्या संगणक अभियंता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महादेव हरिबा लिंगे यांनी लोणीकंद ठाण्यात फिर्याद दिली.
लोहगाव-भावडी रस्त्यावरील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती शनिवारी दुपारी लोणीकंद पोलिसांना मिळाली. डोंगराच्या पायथ्याजवळ गौरवची दुचाकी सापडली होती. दुचाकी क्रमांकावरून पोलिसांनी शोध घेऊन ओळख पटविली होती. खराडी येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत गौरव नोकरीस होता. या भागातीलच एका सोसायटीत तो मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गौरव जेवायला जातो, असे मित्रांना सांगून बाहेर पडला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही.

पाेलिसांनी याप्रकरणी आराेपी भगवान याला कळंब तालुक्यातील परतापूर येथून पकडले. भगवान पुण्यात ॲप आधारित मोटार चालवत होता. गौरवने ॲपवरून मोटारीची दोन वेळा नोंदणी केली होती. गौरव आणि भगवान यांची ओळख झाली होती. गौरवने मोटारचालक भगवान याचा मोबाइल क्रमांक घेतलेला होता. गौरव भगवानला तीन हजार रुपये देणे लागत होता. गौरवने वेळेवर पैसे दिले नसल्याने भगवान त्याच्यावर चिडला होता. शुक्रवारी रात्री भगवानने त्याला बोलावून घेतले. भगवान त्याचा साथीदार आणि गौरव मोटारीतून वाघोलीतील डोंगराच्या पायथ्याशी गेले. तेथे त्यांच्यात वादावादी झाली. भगवान आणि साथीदाराने गौरवच्या गळ्यावर शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले.

Web Title: Murder of computer engineer for three thousand rupees The cab driver was caught within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.