पुणे: सराईत गुन्हेगारांकडून गुन्हेगाराचा खून; पत्नीबाबत अपशब्द वापरल्याचे ठरले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 04:35 PM2022-07-29T16:35:09+5:302022-07-29T16:40:02+5:30

या खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात आले...

Murder of criminal by Sarai criminals; The reason was determined to be abusive towards his wife | पुणे: सराईत गुन्हेगारांकडून गुन्हेगाराचा खून; पत्नीबाबत अपशब्द वापरल्याचे ठरले कारण

पुणे: सराईत गुन्हेगारांकडून गुन्हेगाराचा खून; पत्नीबाबत अपशब्द वापरल्याचे ठरले कारण

Next

पुणे : पत्नीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून दोघा गुन्हेगारांनी तिसऱ्या गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आखाड पार्टी साजरी करण्यासाठी बोलावून हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोरी (वय ३२, रा. पर्वती दर्शन कॉलनी) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने दोघांना अटक केली आहे.

सुधीर ऊर्फ बंडू गौतम थोरात (वय ३२, रा. कुंभारवाडा, सदाशिव पेठ), संदीप ऊर्फ सॅन्डी सुरेंद्र नायर (वय २८, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना नवी पेठेतील पूना हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूला गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजता उघडकीस आली. याबाबत वैशाली गणपत जोरी (वय ३०) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंंद जोरी हा बंडू थोरात याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरत होता. त्याचा थोरात याला राग होता. जोरी हा दारूच्या नशेत थोरात याला दिसला. त्यानंतर त्याने मित्र सँडी नायर याला सोबत घेऊन इतर मित्रांसह बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नवी पेठेतील पूना हॉस्पिटलजवळील सागर हॉटेलच्या मागील बाजूस आखाड पार्टी साजरी करण्याचा बेत आखला. त्यानुसार ते तेथे गेले. तेथे सर्व जण दारू प्यायले. इतर व्यक्ती तेथून निघून गेल्या. शेवटी थोरात, जोरी व सँडी हे तिघेच मागे राहिले होते. दोघांनी धारदार शस्त्राने जोरी याच्यावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास तेथून पायी जात असलेल्या नागरिकास खुनाचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलिसांना खबर दिली.

पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी निरीक्षण करून उपलब्ध असलेला वस्तुजन्य पुरावा व खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून आनंद जोरी याची ओळख पटविली. संदीप नायर व सुधीर थोरात हे संशयित धायरी भागात पळून गेल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन दोघांना पकडले आणि विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड, रमेश तापकीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

तिघेही सराईत गुन्हेगार

संदीप नायर याच्यावर गंभीर दुखापतीचे २ व जबरी चोरीचा १ असे ३ गुन्हे दाखल असून, त्याला पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सुधीर थोरात याच्याविरुद्ध गंभीर दुखापतीचे २, घरफोडीचा १, इतर चोरीचे ७ असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. तर आनंद जोरी याच्यावर घरफोडी चोरीचे ८, इतर चोरीचे २, फसवणुकीचा १, अमली पदार्थ १, तडीपार आदेशाचा भंग केल्याचे ३ असे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. तिघेही एकमेकांचे मित्र होते.

Web Title: Murder of criminal by Sarai criminals; The reason was determined to be abusive towards his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.