Pune Crime: पैशाच्या किरकोळ वादावरून वादातून जावयाचा खून, सासऱ्याला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 09:51 AM2024-04-09T09:51:29+5:302024-04-09T09:52:20+5:30
दंड न भरल्यास सश्रम कारावासाची शिक्षा देण्याचे आदेशात नमूद केले आहे....
पुणे : पैशाच्या किरकोळ वादावरून जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला वडगाव मावळ जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सश्रम कारावासाची शिक्षा देण्याचे आदेशात नमूद केले आहे.
दत्तू बाळू मोहिते असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने कुऱ्हाडीने डोक्यात वार करून जावयाचा खून केला होता. यात सुनील जाधव मयत झाला. तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये आरोपी मोहिते याच्यावर भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त सरकारी वकील स्मिता मुकुंद चौगले यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. सरकारी वकील चौगुले यांनी न्यायालयात योग्य पुरावे सादर करून खटला सिद्ध करण्यासाठी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्याकरिता त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले.
देहू रोडचे सहायक पोलिस आयुक्त देवीदास घेवारे, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील, तत्कालीन तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक डी. आर. अतिग्रे यांच्या मार्गदर्शनानुसार कोर्ट अंमलदार पोलिस कॉन्स्टेबल अविनाश हरी गोरे यांनी या खटल्यामध्ये वडगाव मावळ न्यायालयामध्ये पाठपुरावा केला होता.