मानलेल्या बहिणीला त्रास देणाऱ्यास ताकीद दिल्याच्या रागातून दोघांचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 09:53 AM2022-06-17T09:53:23+5:302022-06-17T09:56:14+5:30
मृतदेह खाणीमध्ये आढळल्याने खळबळ...
पुणे : विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह शनिवारी (दि.७) खाणीमध्ये आढळल्याने खळबळ उडाली होती. मानलेल्या बहिणीला त्रास देणाऱ्यास ताकीद दिल्याच्या रागातून या दोघांचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या एकाचा पोलीस शोध घेत आहेत.
प्रसन्न थुल (वय १९, रा. मेंटल कॉर्नर, येरवडा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह अनिकेत उरुणकर उर्फ उऱ्या (वय २५, रा. औंध) याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी प्रकाश लंके (वय २०) आणि सुशांत सचिन बडदे (वय २१, दोघेही रा. विश्रांतवाडी) असे खून झालेल्या तरुणांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. व्ही. भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी परिसरात राहणारे विकी लंके व सुशांत बडदे ७ जूनपासून बेपत्ता होते. ११ जून रोजी खाणीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र, दोघांच्याही शरीरावर मारहाणीच्या किंवा शस्त्राने वार केल्याच्या खुणा नव्हत्या. मुलीच्या कारणावरून खून झाल्याची चर्चा सुरू होती. विकीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरून या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. विकी व सुशांत यांच्यासमवेत शेवटच्यावेळी कोण होते, याचा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा थुल आणि अनिकेतचे नाव पुढे आले. पोलिसांनी थुलला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने अनिकेतच्या मदतीने दोघांचा खून केल्याचे कबूल केले.
सुशांतने हा प्रकार पाहिल्याने त्यालाही खाणीत ढकलले
विकीच्या मानलेल्या बहिणीशी अनिकेतचा मित्र छेडछाड करीत होता. विकीने अनिकेतमार्फत त्याला समज दिली होती. या कारणावरून अनिकेत व विकीची भांडणे झाली होती. ७ जून रोजी रात्री अनिकेत आणि प्रसन्न या दोघांनी सुशांत व विकीला त्यांच्या घरापासून काही अंतरावर दारू पिण्यासाठी नेले. त्यांना रात्रभर दारू पाजली. पहाटेच्या सुमारास त्यांनी विकीला खाणीमध्ये ढकलून दिले. सुशांतने हा प्रकार पाहिल्याने त्यालाही खाणीत ढकलून दिले.