जागेच्या वादातून तरुणाचा खून; आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना, धायरी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:04 AM2024-02-21T10:04:35+5:302024-02-21T10:04:52+5:30
आरोपी आणि तरुण हे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे
कल्याणराव अवताडे
धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील रायकर मळा येथे जागेच्या वादातून एका तरुणाचा निघृणपणे खून करण्यात आला आहे. आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे (वय:१९, रा. खंडोबाचा माळ, रायकर मळा, धायरी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत संपत तानाजी काळोखे व सागर पोपट रायकर या दोघाविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आदित्य पोकळे व संपत काळोखे हे नातेवाईक आहेत. त्यांच्यात जागेवरून वाद आहे. दरम्यान मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आदित्य हा सदर वादग्रस्त जागेवर कामगारांसह पत्रा शेडचे काम करीत होता. त्यावेळी संपत काळोखे व सागर रायकर हे दोघे त्या ठिकाणी आले. यावेळी आदित्य व संपत यांच्यात वाद झाले. त्यानंतर दोघांनी आदित्यच्या पाठीत धारदार हत्याराने वार केले. यामध्ये आदित्यचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आदींनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना केल्या. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.