विश्रांतवाडीत तरुणाचा खून, उपचारादरम्यान झाला मृत्यू, आरोपीची कारागृहात रवानगी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 14:35 IST2024-01-15T14:33:04+5:302024-01-15T14:35:22+5:30
विश्रांतवाडी पोलिसांनी गंभीर जखमी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कलम वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केला

विश्रांतवाडीत तरुणाचा खून, उपचारादरम्यान झाला मृत्यू, आरोपीची कारागृहात रवानगी!
लोहगाव : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या डाेक्यात सिमेंट ब्लाॅकचा वार करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या अमीर सय्यद (वय २७, रा. शांतीनगर, विश्रांतवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी सोनू छजलानी (वय २४, रा. शांतीनगर विश्रांतवाडी) याला अटक करण्यात आली असून, पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केलेली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ८ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सोनू छजलानी याने अमीर याला सिमेंट ब्लॉकने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात गुरुवारी रवानगी करण्यात आली. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
विश्रांतवाडी पोलिसांनी गंभीर जखमी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कलम वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नातेवाइकांनी सोनू छजलानीसह इतर अन्य आरोपींचा देखील गुन्ह्यात समावेश असल्याचा आरोप केला होता. मात्र, प्रत्यक्ष तपासात उपलब्ध सीसीटीव्ही व माहितीवरून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केल्याची माहिती यावेळी विश्रांतवाडी पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.