बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:53 IST2025-04-07T14:52:26+5:302025-04-07T14:53:26+5:30
खून करून आरोपी बहुळ (ता. खेड) येथे एका ठिकाणी डोंगरावरील गोठ्यावर लपून बसले होते

बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चाकण : व्याजाच्या पैशांच्या वादातून बारामती तालुक्यात सावकाराचा खून करून पळालेल्या दोघांना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ (ता. खेड, जि. पुणे) गावाच्या हद्दीत डोंगरात लपून बसलेले असताना चाकण गुन्हे शाखेचे पोलिसांनी अटक केली आहे. रोहित गाडेकर (वय २७ वर्षे,रा. मासाळवस्ती,सोरटेवाडी ता. बारामती) असे रोजी रात्री बारामती तालुक्यात खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर खून करणारे सागर माने (वय२५ वर्षे ) आणि विक्रम मासाळ (वय.३० वर्षे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावाच्या हद्दीत एका २७ वर्षीय तरुणाचा धारदार शास्त्राने वार करत खून केल्याची घटना घडली होती. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक व्यवहारातून सदरचा खून झाल्याची बाब समोर आली होती. सोरटेवाडी (कुलकर्णी चारी) येथे आरोपींनी रोहित गाडेकर यांच्या छातीवर व मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.
गोपनीय खबऱ्यामार्फत चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, वडगाव निंबाळकर येथील रोहित सुरेश गाडेकर (रा. सोरटेवाडी ता. बारामती) याचा खून झाला होता, यातील अज्ञात आरोपी हे बहुळ (ता. खेड) येथे एका ठिकाणी डोंगरावरील गोठ्यावर लपून बसले आहेत. त्यानंतर चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे,सुनील भागवत,रेवन खेडकर, शरद खेरणार,महेश कोळी यांचे पथक बहुळ गावात पोहचले. पोलिसांना पाहून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागले. पोलिसांच्या पथकाने गोठ्यातून पळून जाताना पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.संशयित आरोपी सागर आणि विक्रम यांनी सदरच्या खुनाच्या गुन्हयाची कबूली दिली आहे.
खून झालेला रोहित सुरेश गाडेकर याने आरोपीना दिलेल्या व्याजाच्या पैश्याचा तगादा लावून आरोपींना मारहाण करत होता. त्याच वादाच्या कारणावरून आरोपींनी कोयत्याने मारहाण करून रोहित गाडेकर यास जीवे ठार मारून खून केला असल्याची माहिती चाकण पोलिसांना दिली आहे. पुणे ग्रामीण मधील वडगाव निंबाळकर पोलिसांना या बाबत चाकण पोलिसांनी कळवले आहे. खुनाच्या घटनेतील संशयित आरोपी सुमारे १० वर्षांपूर्वी चाकण परिसरात वास्तव्यास होते, त्यामुळे त्यांना चाकण परिसराची माहिती होती. त्यामुळे त्यांनी खून केल्यानंतर लपण्यासाठी चाकण जवळील बहुळमध्ये येऊन आसरा घेतला होता. मात्र या दोन्ही आरोपींना चाकण पोलिसांनी जेरबंद केले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जन्हाड व त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.