बुधवार पेठ हादरली! एकाच रात्री देहविक्रय करणारी महिला अन् पोलिसाची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 06:39 PM2021-05-05T18:39:33+5:302021-05-05T18:39:52+5:30
तडीपार गुंडाकडून सहायक फौजदाराचा गळा चिरून निर्घृण खून.....
पुणे : बुधवार पेठेत देहविक्रय करणार्या ३० वर्षाच्या महिलेचा तिच्या ओळखीच्या मित्राने चाकूने भोसकून खुन केला. ही घटना बुधवार पेठेत पहाटे साडेतीन वाजता घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी बकर नावाच्या तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा खून केल्यानंतर बकर हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
बकर आणि ही ३० वर्षाची महिला दोघेही मुळचे पश्चिम बंगालमधील राहणारे आहेत. बकर हा भोसरीतील एका हॉटेलमध्ये वेटर आहे. त्यांची पूर्वीपासून ओळख आहे. तो अधून मधून या महिलेकडे येत असत. बकर हा या महिलेच्या पतीला फोन करुन तिच्याबद्दल माहिती देत होता. त्यावरुन त्यांच्यात यापूर्वी वाद झाले होते. तिने बकरला मारहाण केली होती. त्याचा बकरला राग होता.
बुधवारी मध्यरात्री बकर हा तिच्या बुधवार पेठेतील घरी आला होता. माहिती सांगण्याच्या व फोटोच्या कारणावरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यात त्यांनी एकमेकांना मारहाण केली. रागाच्या भरात बकर याने घरातील चाकूने या महिलेवर सपासप वार केले. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तेथील नागरिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु, उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यु झाला. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तडीपार गुंडाकडून सहायक फौजदाराचा गळा चिरून निर्घृण खून
तडीपार गुंडाकडून मध्यरात्री सहायक फौजदारावर चाकूने वार करुन खुन केल्याची घटना समोर आली आहे. बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ मध्यरात्री सव्वा बारा वाजता हा प्रकार घडला. सहायक फौजदार समीर सय्यद (वय ४८, रा. खडक पोलीस वसाहत) असे खुन झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तडीपार गुंड प्रवीण महाजन (वय ३४, रा. कसबा पेठ) याला अटक केली आहे.
प्रवीण महाजन याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत त्याला दोनदा तडीपार केले आहे. असे असतानाही त्याची गुंडगिरी थांबली नव्हती. सहायक फौजदार समीर सय्यद हे सध्या फरासखाना पोलीस ठाण्यात नियुक्तीवर होते. काल रात्री ते ड्युटीवरुन घरी जात होते. त्यावेळी श्रीकृष्ण टॉकीजजवळ त्यांना प्रवीण महाजन दिसला. त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी प्रवीण याने त्याच्याकडील चाकुने सय्यद यांच्यावर वार केले. त्यातील एक वार गळ्यावर लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला. हे पाहून तेथे असलेल्या लोकांनी प्रवीण याला पकडले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी सय्यद यांना केईएम हॉस्पिटलमध्ये नेले. गळ्यावर वार झाला असल्याने त्यातच त्यांचा मृत्यु झाला.