उसन्या पैशाच्या वादातून तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:47 PM2018-12-09T14:47:00+5:302018-12-09T14:55:42+5:30
उसने दिलेले पैसे परत मागितल्यावरुन झालेल्या वादात कोयत्याने सपासप वार करुन तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
पुणे - उसने दिलेले पैसे परत मागितल्यावरुन झालेल्या वादात कोयत्याने सपासप वार करुन तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोंढव्यातील भाग्योदयनगर येथे मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
शहेबाज शाकीर शेख (20) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. जुबेर युन्नुस सय्यद (22) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फैयाज तहेनुर शेख (24) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैयाज शेख, जुबेर शेख, सोहेल शेख आणि शेहबाज हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. अधूनमधून ते एकमेकांना भेटत असतात. काही दिवसांपूर्वी जुबेर याने शेहबाज याला 5 हजार रुपये उसने दिले होते. परंतु, शहेबाज पैसे परत देत नव्हता. त्यावरुन त्यांच्यात वाद होता. मागील एक महिन्यांपासून ते एकमेकांशी बोलत नव्हते.
रामटेकडी येथे रात्री साडे दहा वाजता फैयाज, जुबेर आणि सोहेल हे तिघे पार्टी करीत बसले होते. त्यावेळी शहेबाज याने जुबेर याला फोन करुन रामटेकडी रेल्वे गेटच्या बाजूला येण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिघेही रेल्वे गेटजवळ गेले. तेथे खूप दिवस झाले भेटलो नाही म्हणून आपण पार्टी करुन असे शहेबाज जुबेरला म्हणाला. त्यानंतर बराच वेळ तेथे बोलत बसल्यावर शहेबाज याला सोडविण्यासाठी सर्व जण कोंढव्यात आले. मक्का टेरेज बिल्डिंगसमोर जुबेर याने पुन्हा शहेबाजकडे पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांच्या वाद झाला. शहेबाज रागाने घरात गेला व तो कोयता घेऊन आला व वारंवार पैशाची गोष्ट करतो, तुला दाखवतोच असे म्हणून त्याने जुबेरच्या कानावर व गालावर तसेच हातावर कोयत्याने सपासप वार केले. जुबेर मोठ्याने ओरडल्यावर शहेबाज पळून गेला. इतरांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात आणले. तेथे उपचार सुरु असताना जुबेर याचा मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, कोंढव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शहेबाज शेख याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.