चांदणी चौकात सुरक्षारक्षकाचा निर्घृण खुन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:45 PM2018-06-12T15:45:04+5:302018-06-12T15:45:04+5:30
चांदणी चौकात एका सुरक्षारक्षकाच्या डोक्यात दगड घालत खुन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुणे : पौड रोडवरील चांदणी चौकात एका सुरक्षारक्षकाच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे़. जीवनलाल रामसुरत मिस्तिकल (वय ६३, रा़ वारजे माळवाडी,मूळगाव- रुपोली, उत्तर प्रदेश) असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे़. याप्रकरणी सचिन सोनार(वय- ३१, रा.महादेवनगर, मांजरी बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवनलाल मिस्तिकल हे चांदणी चौकाजवळ असलेल्या केसी पीएल कंपनीत कामाला होते़.ते रात्री नेहमीप्रमाणे कामावर आले होते़. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे़. आज सकाळी ९ च्या सुमारास ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोकांना आढळून आले़. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले़. हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आला आहे़. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले़ नाही. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.पी.सोनावणे गुन्हयाचा पुढील तपास करत आहे.