पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:36+5:302021-05-07T04:10:36+5:30
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश, शाम व त्यांचे काही मित्र हे रायकरमळा येथील जाधवनगर भागातील ओढ्यालगत असणाऱ्या ...
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश, शाम व त्यांचे काही मित्र हे रायकरमळा येथील जाधवनगर भागातील ओढ्यालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसणार होते. तसा त्यांचा बेत सुरु होता. दरम्यान, आरोपी व फिर्यादी यांच्यात पूर्वीचे वाद आहेत. ते एकमेकांना ओळखतात. रात्री दारू पिण्याचा बेत सुरू असतानाच आरोपी तेथे आले. त्यांच्या हातात कोयते आणि तलवारी होत्या. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अनिकेत ऊर्फ मोन्या पोळेकर याने तुम्हाला मस्ती आली आहे का, आज तुम्हाला खपवून टाकतो, तुम्ही खुनशीने पाहता का, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, फिर्यादीवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. तर फिर्यादीचा मित्र शाम याच्यावर दगडाने, तलवारीने तसेच कोयत्याने सपासप वार केले. यात शाम सोनटक्के हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर फिर्यादीच्या बोटाला दुखापत झाली असून तो जखमी झाला. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. बातमीदारामार्फत तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासणी करून आरोपींना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यातील आरोपी अनिकेत ऊर्फ मोन्या पोळेकर (वय १९, रा. रायकरमळा, धायरी, पुणे) याला अटक केली आहे. तर इतर चार आरोपी हे अल्पवयीन असून पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले अधिक तपास करीत आहेत.
चौकट :
चार तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या...
आरोपी मोन्या पोळेकर याच्यावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात पूर्वी एक गुन्हा दाखल आहे. आरोपी मोन्या पोळेकर व फिर्यादी योगेश चव्हाण तसेच शाम सोनटक्के यांच्यात वाद होता. याआधी त्यांची तू -तू मैं- मैं झाली होती. फिर्यादी मित्रांसमवेत दारू पीत असल्याचे समजल्यानंतर आरोपीने साथीदारासह तिथे जाऊन हल्ला केला. लॉकडाऊन असताना खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली. सिंहगड रस्ता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून तसेच बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून अवघ्या चार तासांत आरोपींचा शोध घेतला. आरोपी मोन्या पोळेकरला न्यायालयात हजर केले असता १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.