Pune: दारु पिण्यावरुन झालेल्या वादात दगड डोक्यात घालून केला खून; काही तासातच आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 01:54 PM2022-01-14T13:54:51+5:302022-01-14T13:55:02+5:30
दारु पित असताना झालेल्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला. कोणतेही धागेदोरे नसताना बिबवेवाडी पोलिसांनी काही तासात गुन्हेगाराला जेरबंद केले.
पुणे : दारु पित असताना झालेल्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला. कोणतेही धागेदोरे नसताना बिबवेवाडीपोलिसांनी काही तासात गुन्हेगाराला जेरबंद केले. शिवदत्त ऊर्फ डि ऊर्फ दत्तात्रय चंद्रकांत सकट (वय ३४, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. विशाल ओव्हाळ (वय २६, रा. पद्मावती वसाहत, पद्मावती) असे खून झालेल्याचे नाव आहे.
महेश सोसायटी चौकातील राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या मागे पार्किंगमध्ये एका मृतदेह पडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाने १० जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता बिबवेवाडी पोलिसांना कळविली. पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेतला असता तो मृतदेह विशाल ओव्हाळ याचा असल्याचे निष्पन्न झाले. विशाल हा काही काम धंदा करीत नव्हता. तसेच तो मोबाईलही वापर नसल्याने त्याला कोणी फोन केले किंवा त्याने कोणाला फोन केले याचीही माहिती मिळू शकत नव्हती. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे कठीण झाले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार संतोष पाटील, शाम लोहमकर, गणेश दुधाने, पोलीस अंमलदार शिवाजी येवले, सचिन फुंदे यांनी संपूर्ण परिसरात तसेच ओव्हाळ याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. तपासादरम्यान विशालचे मित्र व नातेवाईक व घटनास्थळाजवळचे अस्पष्ट फुटेज व गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हा खून शिवदत्त सकट याने केल्याचे कळाले. त्यानुसार पोलीस अप्पर ओटा परिसरात त्याचा शोध घेत होते. यावेळी शिवदत्त हा तेथील गॅस गोडावूनच्या दिशेने पायी चालत जात असताना दिसला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पण पोलिसांना खात्री असल्याने त्याला बोलते केले. तेव्हा त्याने खूनाची कबुली दिली.
विशाल हा कोणीही दारु पाजत असेल तर त्याच्याबरोबर जात असे. विशाल व शिवदत्त हे दारु पित बसले असताना त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी रागात शिवदत्त याने दगड डोक्यात घालून त्याचा खून केला. शिवदत्त हा महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांनी सांगितले.