दोन तरुणांचा मुलीच्या पित्याकडून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:21+5:302021-07-18T04:08:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : वीटभट्टी कामगाराने वीटभट्टी मालकाच्या मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दोघांनाही पकडून, तसेच त्यांना मदत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : वीटभट्टी कामगाराने वीटभट्टी मालकाच्या मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दोघांनाही पकडून, तसेच त्यांना मदत करणाऱ्या एकाला हॉटेलवर डांबून ठेवत तिघांनाही दांडक्याने मारहाण करत दोन तरुणांचा खून केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे शनिवारी (दि. १७) घडली. नराधाम बापाने मुलीलाही मारहाण केली असून, ती गंभीर जखमी झाली आहे. तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ऑनरकिलिंगसारखा हा प्रकार खेड तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे.
बाळू सीताराम गावडे (वय २६, रा. आसखेड खुर्द. ता. खेड, जि. पुणे), राहुल दत्तात्रय गावडे (वय २८, रा. आसखेड खुर्द) अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी करंजविहिरे येथील ‘माणुसकी’ या हॉटेलचे मालक बाळू मरगज यांच्यासह अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, चंद्रकला ऊर्फ मुक्ता बाळू गावडे, आनंदा सीताराम जाधव (सर्व जण रा. करंजविहिरे, ता. खेड) यांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करंजविहिरे (ता. खेड) येथे माणुसकी हे मोठे हॉटेल आहे. बाळू मरगज यांच्या मालकीचे हे हॉटेल असून, हॉटेलच्या समोर मरगज यांचीच मोठी वीटभट्टी आहे. त्याच्या वीटभट्टीवर बाळू सीताराम गावडे हा काम करत होता. बाळू गावडे याचे यापूर्वी चंद्रकला गावडे यांच्याशी विवाह झाला होता. दोघांनाही मुले आहेत. मात्र, असे असतानाही बाळू याने याचे मरगज यांच्या २१ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध ठेवले होते. बाळू गावडे हा त्याच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या राहुल दत्तात्रय गावडे याच्या मदतीने मरजग यांच्या मुलीला पळून नेले होता. दरम्यान, ही घटना बाळू मरगज यांना कळाली. त्यांनी त्यांच्या नातेवाइकांसह दोघांचा शोध घेतला. बाळू, राहुल तसेच मुलींचा शोध घेऊन मरगज यांनी तिघांना त्यांच्या हॉटेलमध्ये आणले. या वेळी मरगज व त्यांचे नातेवाईक तसेच बाळू याची बायको चंद्रकला यांनी तिघांनाही लाकडी तसेच लोखंडी दांडक्याने जबर मारहाण केली. या घटनेत बाळू व राहुल यांचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलिसांनी घटनेनंतर आरोपी व त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेत ठार झालेले वीटभट्टीवर काम करणारे दोघेही तरुण आदिवासी ठाकर समाजातील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पंचनामा सुरू असून घटनास्थळी चाकण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.