जेवणाची चव न आवडल्याच्या कारणावरुन हातोडा घालून खून; कोंढवा पोलिसांकडून एकास अटक
By नम्रता फडणीस | Published: July 15, 2024 04:59 PM2024-07-15T16:59:34+5:302024-07-15T17:00:28+5:30
जेवणाची चव न आवडल्याने २ मजुरांमध्ये वाद झाले, त्यावेळी एकाने दुसऱ्याच्या डोक्यात हातोडा मारला
पुणे : जेवणाची चव न आवडल्याच्या किरकोळ कारणावरुन बांधकाम मजुराच्या डोक्यात् लोखंडी हातोडा मारून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने आणखी एकाच्या डोक्यात हातोडा मारल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी कोंढवापोलिसांनी एकाला अटक केली. महम्मदवाडी येथील रहेजा मिलेनियम् लेबर् कँम्प च्या मेसमध्ये ही घटना घडली.
भुवन सस्तिक सरकार (वय ६३, रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कमल नारायण मारडी (वय ४९, रा. जियापूर, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली. महम्मदवाडी येथील रहेजा मिलेनियम् लेबर् कँम्प भुवन सरकार आणि मारडी राहायला आहेत. रविवारी दुपारी सरकार यांनी सहकारी बांधकाम मजुरांसाठी जेवण तयार केले. जेवणाची चव न आवडल्याने मारडीने सरकारला शिवीगाळ केली. वादातून मारडीने सरकारच्या डोक्यात शेजारी ठेवलेला हातोडा मारला. सरकारच्या नाकावर हातोडा मारण्यात आला. सरकार गंभीर जखमी झाले. आरोपी मारडीने शेजारी असलेल्या रामप्रीत मंडल यांना हातोड्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सरकार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी रात्री उशीरा कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मारडीला अटक करण्यात आली.