जेजुरीत महिलेचा खून , पैशाच्या वादातून दिराचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 04:40 AM2017-09-25T04:40:13+5:302017-09-25T04:40:31+5:30
साकुर्डे येथे पैशाच्या वादातून एका महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरून टाकल्याची घटना घडली. सुमनबाई नारायण गोरड (वय ४५, रा. पुनवर, ता. करमाळा, सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे.
जेजुरी : साकुर्डे येथे पैशाच्या वादातून एका महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरून टाकल्याची घटना घडली. सुमनबाई नारायण गोरड (वय ४५, रा. पुनवर, ता. करमाळा, सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा मुलगा आनंद नारायण गोरड याने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
आनंद हा त्याच्या आईसह पुनवर येथे राहात होता व त्याचे चुलत चुलते धुळा बाबा गोरड हे जेजुरी-सासवड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये रखवालदार म्हणून काम करीत
होते. ते साकुर्डे येथे त्यांच्या
पत्नीसह भाड्याने खोली घेऊन राहात आहेत. आनंद हा पोलीस भरतीच्या अभ्यासाकरिता श्रीगोंदा येथे काही दिवसांकरिता राहण्यास गेला होता.
दि. ११-९-२०१७ रोजी त्याची आई श्रीगोंदा येथे आली. तिने त्याला शैक्षणिक खर्चाकरिता दोन हजार रुपये दिले व ती गावाकडे निघून गेली.
मात्र दोन दिवस होऊनही ती घरी न पोहोचल्याचे समजल्याने आनंद गावी गेला. तिचा तपास न लागल्याने श्रीगोंदा येथे त्याने पोलीस स्टेशनला आई हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्याने साकुर्डे येथे राहणारे चुलते धुळा गोरड यांना फोन करुन आईबाबत चौकशी केली असता त्यांनी दि.१२-०९-२०१७ तुझी आई माझ्या घरी आली होती.
खंडोबाचे दर्शन घेऊन फलटणला नातेवाइकाकडे जाते असे सांगून निघून गेल्याची माहिती दिली. त्यानंतर धुळा गोरड याला श्रीगोंदा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली.
सुमनबाई यांच्याबरोबर पैसे देणे-घेणेच्या कारणावरुन भांडणे झाली व १३ स्पटेंबर रोजी रात्री एक वाजता तिच्या डोक्यात दगड घालून व पाईपने मारहाण करुन तिचा खून करुन मृतदेह घराजवळ शेतात पुरल्याची माहिती दिली.
आज (दि.२४) श्रीगोंदा व जेजुरी पोलिसांनी पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी, वैद्यकीय अधिकारी व पंचासमक्ष शेतात उत्खनन केले. या वेळी कुजलेल्या अवस्थेत सुमनबाई यांचा मृतदेह आढळला. अंगावरील कपड्यावरून त्यांचा मृतदेह नातेवाइकांनी ओळखला. याबाबत अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे करीत आहेत.