दगडाने ठेचून बांधकाम कामगाराचा खून ; वाघोली परिसरातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 19:51 IST2021-08-05T19:50:41+5:302021-08-05T19:51:05+5:30
कामगाराच्या डोक्यावर, तोंडावर आणि डोळ्यावर दगडाने मारहाण केल्याच्या खुणा

दगडाने ठेचून बांधकाम कामगाराचा खून ; वाघोली परिसरातील धक्कादायक घटना
पुणे : वाघोलीजवळील आव्हाळवाडी परिसरात दगडाने ठेचून एका कामगाराचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
विष्णु सुनिल दास (वय ४०, रा. गणेशनगर, वाघोली, मूळ कलकत्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस पाटील उमेश बबन आव्हाळे (वय ३९, रा. आव्हाळवाडी) यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ ते बुधवारी दुपारी ३ पर्यंतच्या कालावधीत घडली आहे.
विष्णु दास हा त्याच्या पत्नीसोबत वाघोली येथील गणेशनगर वास्तव्यास होता. दोघेही बांधकाम मजूर म्हणून काम करतात. मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दास हा येथील बाजारात गेला होता. त्यावेळी त्याचा काही लोकांसमवेत वाद झाल्याचे समजते. आव्हाळवाडी येथील राजेश घुले यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर, तोंडावर आणि डोळ्यावर दगडाने मारहाण केल्याच्या खुणा आहेत.
या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले़ आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार अधिक तपास करत आहेत.