टोमणा मारणे जीवावर बेतले, जनता वसाहतीत तरुणाचा खुन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 10:29 PM2019-08-25T22:29:13+5:302019-08-25T22:29:18+5:30
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी ललिता गौड हिला ताब्यात घेऊन असून तिचा मित्र गणपत झगडे (
पुणे : बापलेकीत सुरु असलेल्या थट्टामस्करीत लेकीने मारलेल्या टोमण्यावरुन शेजारी राहणाऱ्या महिलेने गैरसमज करुन घेतला व ते मित्राला सांगितले. त्यातून भांडण वाढत गेले़ तेव्हा पोलिसात तक्रार करण्यासाठी निघालेल्या पतीच्या डोक्यात पाइपाने मारहाण करुन त्याचा खुन करण्यात आला. ही घटना जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक ९१ मध्ये रविवारी दुपारी दीड वाजता घडली.
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी ललिता गौड हिला ताब्यात घेऊन असून तिचा मित्र गणपत झगडे (वय ३२, रा़ जनता वसाहत, पर्वती) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. नागनाथ राजाराम कदम (वय ३५, रा़ जनता वसाहत, पर्वती) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीपाल नागनाथ कदम यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, नागनाथ कदम, पत्नी दीपाली व त्यांची मुलगी करुणा (वय १७) हे रविवारी दुपारी घरी पायी थट्टामस्करी करीत होते. त्यांच्यामागे ललिता गौड या येत होत्या, तेव्हा करुणा हिने आपल्या वडिलांना सांगितले की, पप्पा तुम्ही आईची मस्करी करु नका, हळू चला, आई खाली पडली तर तिला लागेल आपल्याकडे पैसा कमविणारे तुम्ही एकटेच आहात. दोन नंबरचा पैसा आपल्याकडे येत नाही, असा टोमणा मारला, हे बोलणे ललिता गौड हिने ऐकले होते. हा टोमणा आपल्यालाच मारला असे गौड हिला वाटले. त्यामुळे, तिने याच वसाहतीमध्ये राहणारा तिचा मित्र गणपत झगडे याला घरी बोलावून हा प्रकार सांगितला. गणपत झगडे याने कदम दाम्पत्याला शिवीगाळ केली. तेव्हा दीपाली कदम यांनी तुमची पोलिसात तक्रार करते, असे म्हटले. त्यावेळी झगडे याने तू पोलिसात तक्रार कशी करते, हे पाहून घेतो अशी धमकी देऊन तो निघून गेला. त्यानंतर दीपाली या नागनाथ यांच्याबरोबर तक्रार देण्यासाठी मोटारसायकलवरुन निघाल्या. तेव्हा गणपत झगडे याने नागनाथ कदम यांच्या डोक्यात लोखंडी पाईपाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच दीपाली यांना मारहाण करुन जखमी केले. नागनाथ यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी घटनास्थळाला भेट दिली.