पुतण्यानेच मित्राच्या मदतीने केला खून
By Admin | Published: July 8, 2017 02:07 AM2017-07-08T02:07:15+5:302017-07-08T02:07:15+5:30
यवतमध्ये पाच दिवसांपूर्वी झालेला खून मृताच्या पुतण्याने त्याच्या एका मित्राच्या सहकार्याने असल्याचे यवत पोलिसांनी उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
यवत : यवतमध्ये पाच दिवसांपूर्वी झालेला खून मृताच्या पुतण्याने त्याच्या एका मित्राच्या सहकार्याने असल्याचे यवत पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
महावीर स्टील इंडस्ट्रीज कंपनीच्या पाठीमागील असलेल्या माळरानावरील निर्जन स्थळी तरुणाची धारदार हत्याराने डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमधील आरोपींना आज सायंकाळी उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी आरोपी मृताचा पुतण्या अमोल हरिदास थोरात (वय २९, रा. खुटबाव, ता. दौंड) व गणेश ब्रिजमोहन चौरसिया (रा. भांडगाव, ता. दौंड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भानुदास गोविंद थोरात (वय २५, रा. मटकाळावस्ती, खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे) असे धारदार हत्याराने हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून झालेल्या भानुदास थोरात यांच्यावर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याने त्या गुन्ह्यांच्या संबंधित कोणीतरी खून केला असेल, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना वाटत होता. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांनी भेट दिली होती. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे व पथकाने खुनाचा तपास वेगाने सुरू केला होता. प्राथमिक अंदाज वाटणाऱ्या आरोपींना तत्काळ ताब्यात घेऊन तपास केला, मात्र हा खून त्यांनी केला नसल्याचे समोर आल्यानंतर संशयितांना सोडून देण्यात आले होते.
मागील चार दिवसांत खुनाचे आरोपी पोलिसांना मिळाले नव्हते, मात्र आज पोलिसांनी वेगळ्या अंगाने याचा तपास केला असता पुतण्या अमोल हरिदास थोरात याने खून केल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्याला ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली.
खुनाचे कारण अस्पष्ट
यवत मध्ये झालेला खून पुतण्याने केला असल्याची कबुली पोलिसांकडे दिल्यानंतर खून कोणी केला याचे गूढ उलगडले असले तरी खुन नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे पोलिसांच्या पुढील तपासात निष्पन्न होईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली.