जन्मदात्याचा खून करून मृतदेह कालव्यात फेकला; मुलाला आजन्म कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 07:41 PM2022-11-24T19:41:56+5:302022-11-24T20:04:33+5:30

धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचा मृतदेह निराडाव्या कालव्यात फेकून देण्यात आला होता

Murdered the father and threw the body into the river; The child was sentenced to life imprisonment | जन्मदात्याचा खून करून मृतदेह कालव्यात फेकला; मुलाला आजन्म कारावासाची शिक्षा

जन्मदात्याचा खून करून मृतदेह कालव्यात फेकला; मुलाला आजन्म कारावासाची शिक्षा

googlenewsNext

बारामती : जन्मदात्याचा गळ्यावर चाकुने वार करुन खुन करणाऱ्या मुलाला बारामतीच्या अतिरीक्त व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अभय अभय दिगांबर काटे असे या आरोपी मुलाचे नाव आहे. १२ मे २०१७ रोजी काटेवाडी(ता.बारामती) येथे संपुर्ण जिल्हा हादरवुन सोडणारी घटना घडली होती.

या बाबतची हकीकत अशी कि, १२ मे २०१७ रोजी दुपारी निरा डाव्या कालव्याच्या सणसर नजिक रायतेमळा येथे दिगंबर दादासाहेब काटे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचा मृतदेह निराडाव्या कालव्यात फेकून देण्यात आला होता. या घटनेत सुरवातीला अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासानंतर पोलिसांची संशयाची सुई मुलाकडे वळली होती. या घटनेचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक उत्तम भजनावळे व सहायक फौजदार प्रभाकर बनकर यांनी केला. पोलिसांनी सखोल तपासानंतर मुलगा अभय दिगांबर काटे याला अटक करून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला होता.

या खटल्याची सुनावणी बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश जे. पी. दरेकर यांच्यासमोर चालली. या खटल्यासाठी राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. राजेश कातोरे यांची नियुक्ती केली होती. तर काटे कुटुंबियांच्या वतीने अ‍ॅड. सचिन झालटे, एस.पी. सहाने, निलीमा खर्डे-पाटील, ज्ञानेश्वर जे. माने यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी सहायक फौजदार नामदेव नलवडे व डी.एस. जगताप यांनी सरकारी पक्षास सहकार्य केले.

या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड. कातोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांचे जबाब यावरून गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाले. बचाव पक्षाने आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा युक्तिवाद केला. तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी काटे यास यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यामध्ये खूनाच्या गुन्ह्यात अभय याला जन्मठेप व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. तर भादवि कलम २०१ मध्ये तीन वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. भादवि ५०६ (२) जीवे मारण्याची धमकी देणे व साक्षीदारांवर दबाव आणण्याच्या कलमाखाली तीन वर्षे सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास, भादवि कलम २०३ अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.

Web Title: Murdered the father and threw the body into the river; The child was sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.