स्वतःच्या वाढदिवसाचे साहित्य खरेदी करून जाताना झाला खून; बारामतीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:32 PM2024-08-22T12:32:16+5:302024-08-22T12:32:39+5:30
जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन गन्हेगाराच्या डोक्यात व मानेवर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून करण्यात आला
सांगवी (बारामती) : स्वतःच्या वाढदिवसाचे साहित्य घेऊन निघालेल्या बारामती तालुक्यातील जळोची येथे जुन्या भांडणाच्या वादातून चार चाकी वाहनातून आलेल्या टोळक्याने बुधवारी रात्री गणेश धुळाबापु वाघमोडे (वय १७) या अल्पवयीन गुन्हेगार मुलाचा डोक्यात वर्मी घाव घालून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत फिर्यादी नवनाथ उत्तम चोरमले (वय ३९), धंदा फोटो ग्राफर (रा-अहिल्यादेवी चौक जळोची ता.बारामती,जि. पुणे)यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहॆ.
जयेश बाळासाहेब माने,शुभम गायकवाड,करण जाधव,अविष गरुड,सोमनाथ जाधव, भोल्या व इतर सर्व (रा.बारामती) अशी खुनात सहभागी असलेल्या आरोपींची नावे आहेत. सातत्याने बारामतीत गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीचे सत्र सुरू आसल्याने पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत आहॆ. बारामतीच्या पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक नसल्याने असे खून करण्यापर्यंत गुन्हेगारांचे धाडस वाढत आहॆ. बुधवारी २१ रोजी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ हा खुनाचा थरारक घडून आला आहॆ.
जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ चारचाकी इनोव्हा गाडीतुन जयेश बाळासाहेब माने, शुभम गायकवाड,करण जाधव,अविष गरुड, सोमनाथ जाधव,भोल्या व इतर सहकाऱ्यांनी गेल्या वर्षी टी.सी. कॉलेज येथे गणेश धुळाबापु वाघमोडे याच्या सोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन गणेश धुळाबापु वाघमोडे याच्या डोक्यात व मानेवर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून करण्यात आला आहे.
गणेश वाघमोडे याच्यावर खून, एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणे, अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन गुन्हे करणे टोळी निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे ४ गुन्हे दाखल आहेत. एक महिन्या नंतर गणेश अठरा वर्षांचा होणार होता. त्यानिमित्ताने तो स्वतःच्या वाढदिवसाची खरेदी करून घरी निघाला होता. यावेळी टोळक्याने त्याचा निर्घुण खून केला.