मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाचा मर्डर करणाऱ्यास पुण्यातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 09:58 PM2019-06-04T21:58:00+5:302019-06-04T21:58:47+5:30
आनंद नारायण हा मुंबईतील एका वृत्तवाहिनीत मार्केटिंग विभागात काम करीत होते.
पुणे : हॉटेल व्यवसायातील वादातून भागीदाराचा खुन करुन पुण्यात पळून आलेल्या एकास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पकडले. खुनाची घटना घडल्यानंतर 12 तासात पुणे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. सारंग हरीश पाथरकर (वय 34, रा़ सामना परिवार सोसायटी, गोरेगाव इस्ट, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव असून त्यास शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळून अटक करण्यात आली. आनंद नारायण (रा. अँटॉप हिल, मुंबई) असे हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अँटॉप हिल भागात घडली होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आनंद नारायण हा मुंबईतील एका वृत्तवाहिनीत मार्केटिंग विभागात काम करीत होते. ती नोकरी सोडून त्यांनी सारंग पाथरकर यांच्याबरोबर भागीदारीत हॉटेल व्यवसाय सुरु केला. परेल भागात त्यांचे हॉटेल आहे. त्यानंतर आनंद नारायण यांनी दादर भागात 4 ते 5 महिन्यांपूर्वी दुसरे हॉटेल सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी परेल येथील हॉटेलमधील साहित्य वापरले होते़ हे नवीन हॉटेल चालत नसल्याने त्यांनी सारंग याला ते चालविण्यास घेण्यास सांगितले होते़ यावरुन त्यांच्यात आर्थिक वाद सुरू झाला होता. सोमवारी रात्री आनंद नारायण, सारंग पाथरकर व आणखी एक जण आनंद यांच्या अँटॉप हिल येथील फ्लॅटवर दारु पित बसले होते. मध्यरात्री एक ते दीडच्यासुमारास त्यांच्यात वाद झाला, तेव्हा सारंग याने आनंद यांच्या गळ्यावर वार करुन त्यांचा खुन केला. त्यानंतर तो पळून गेला. त्यांच्याबरोबरच्या माणसाने ही बाब अँटॉप हिल पोलिसांना कळविली. पोलिसांनी सारंगचा शोध सुरु केला होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकातील पोलीस नाईक तुषार खडके व हवालदार रिजवान जिनेडी यांना मुंबईत खुन करुन एक जण पुण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळून सारंग पाथरकर याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. पुणे पोलिसांनी अँटॉप हिल पोलिसांकडे चौकशी केल्यावर आनंद नारायण यांच्या खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती दिली. पुणे पोलिसांनी सारंगला पकडल्याचे समजताच मुंबई पोलिसांचे पथक तातडीने पुण्यात आले. सारंगला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, दिनेश पाटील, तुषार खडके, रिजवान जिनेडी यांच्या पथकाने केली.