प्रेमसंबंधातून खून करणारा अटकेत, मृतदेह कॅनॉलमध्ये टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 07:03 AM2018-05-03T07:03:21+5:302018-05-03T07:03:21+5:30
प्रेमसंबंधातील काटा दूर करण्यासाठी तिघांनी एका तरुणाला दगडाने ठार करून त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
पुणे : प्रेमसंबंधातील काटा दूर करण्यासाठी तिघांनी एका तरुणाला दगडाने ठार करून त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला़ हवेली पोलिसांनी त्यातील प्रमुख आरोपीला अटक केली आहे़
मनोज श्रीपती काकडे (रा़ सर्व्हंट क्वॉर्टर, डीआयएटी, गिरिनगर, खडकवासला) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ त्याचे साथीदार दत्ता कांबळे आणि दत्ता मोरे (रा़ खामगाव, मावळ, ता़ हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री दहा वाजता घडली होती़ अनिरुद्ध तिमाजी गोंधळे (वय ४२, रा़ न्यू मल्टी क्वाटर्स, डीआयएटी, गिरिनगर, खडकवासला) असे खून झालेल्याचे नाव आहे़
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मनोज काकडे याचे गोंधळे याच्या पत्नीबरोबर प्रेमसंबंध होते़ या कारणावरून गोंधळे हे आपल्या पत्नीला रोज शिवीगाळ, मारहाण करीत असे़ अनिरुद्ध गोंधळे हे एआयएटीमध्ये मजुरी करीत असे़ तेथेच मनोज काकडे हा साफसफाईचे काम करतो़
आपल्या प्रेमिकेला तो देत असलेल्या त्रासातून काकडे व त्याच्या दोन मित्रांनी कट रचला़ ३० एप्रिलला त्यांनी गिरिनगरमध्ये एका बाजूला त्याला बोलवून काठीने मारहाण केली़ त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला़ पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये टाकून दिला़ त्यानंतर हवेली पोलिसांना अनिरुद्ध यांचा मृतदेह सापडला़
पोलिसांनी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करून मनोज काकडे याला अटक केली आहे़