महिलेची हत्या करणारे बापलेक सुपारी किलर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 09:00 PM2018-11-22T21:00:29+5:302018-11-22T21:02:29+5:30
वडगाव शेरी येथील इंद्रमणी सोसायटीतील एकता भाटी यांच्यावर गोळीबार करुन हत्या करणारे आणि पुणे स्टेशनवर पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार करणारे दोघेही बापलेक हे सुपारी किलर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पुणे : वडगाव शेरी येथील इंद्रमणी सोसायटीतील एकता भाटी यांच्यावर गोळीबार करुन हत्या करणारे आणि पुणे स्टेशनवर पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार करणारे दोघेही बापलेक हे सुपारी किलर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी यापूर्वी किमान ४ ते ५ अशाच प्रकारे सुपारी घेऊन गुन्हे केल्याचे पुढे येत आहे. मात्र, याबाबत आणखी सविस्तर तपास करण्याची आवश्यकता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शिवलाल उर्फ शिवाजी बाबुलाल राव (वय ३९) आणि त्याचा मुलगा मुकेश उर्फ माँटी शिवलाल उर्फ शिवाजी राव (वय १९, दोघेही रा. उत्तमनगर, नवी दिल्ली, मुळ रा. जितरन, जिल्हा पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी त्यांची ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
वडगावशेरीतील इंद्रमणी सोसायटीमध्ये राहत असलेल्या एकता ब्रिजेश भाटी यांचा बुधवारी सकाळी ७ पाजून ४५ मिनिटांनी राहत्या घरी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ते पळून जाण्याची शक्यता असल्याचे समोर आले. त्यानुसार आरोपींचा शोध सुरू केला ते पुणे स्टेशनवरून झेलम एक्स्प्रेसने दिल्ली येथे पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या शोधासाठी ३ पथक तयार करण्यात आली होती. हे दोनही आरोपी झेलम एक्सप्रेसने पळून जात असताना त्यांना पोलीस पकडण्यासाठी गेले असताना शिवलाल राव याने गोळीबार करुन पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना जखमी केले व ते पळून गेले होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन शिवलाल याला मालधक्का येथे पकडले तर मुकेश राव याला रेल्वे पोलिसांनी झेलम एक्सप्रेसमध्ये पकडून पुणे पोलिसांच्या हवाली केले.
दोघानाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पिस्तूल कोठून आणले, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल कोठून आणली, हा गुन्हा कोणत्या कारणांसाठी केला. कोणाच्या सांगण्यावरून खून केला आदी तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आयकार्ड दाखविण्यासाठी खिशात हात घालून काढले पिस्तुल
पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर नेमका हल्ला कसा झाला याची माहिती आता उपलब्ध झाली आहे. शिवलाल व त्याचा मुलगा मुकेश हे झेलम एक्सप्रेसने पळून जात होते. त्यांना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक गजानन पवार व पोलीस नाईक मोहसीन शेख, केदार शेख हे प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी थांबले होते. प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या बाजूला खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक रघुनाथ जाधव व त्यांचा स्टाफ होता. सुरुवातीला आणखी एक टीम संपूर्ण गाडीची तपासणी करीत येत होते. बोगी नंबर ९ मध्ये गजानन पवार हे तपासणी करीत असताना मोहसीन शेख यांना दोघांविषयी संशय आला. त्याने ही बाब पवार यांना सांगितली. त्यांनी या दोघांना बाजूला घेतले. शिवलाल याच्याकडे चौकशी केली. आम्ही पोलीस असल्याचे सांगितले. तेव्हा तो काहीही बोलला नाही. पवार यांनी त्यांच्याकडे आयकार्ड आहे का अशी विचारणा केली अाहे असे सांगून शिवलालने खिशात हाथ घातला व त्यातून पिस्तुल काढून त्यातून एका पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. इतक्या जवळून व अचानक झालेल्या हल्ल्याने पवार यांना बचावाची काहीही संधी मिळाली नाही. ते प्लॅटफॉर्मवर पडले. त्यानंतर रघुनाथ जाधव यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. पवार यांच्या जबड्यात एक गोळी अडकली होती. दुसरी खांद्याला चाटून गेली तर तिसरी गोळी फुफ्फुसाला लागली होती.
सारसबागेत केला टाईमपास
शिवलाल व त्यांचा मुलगा दोन दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. घोरपडी येथे एका नातेवाईकाच्या घरी दोघे उतरले होते. त्यांनी वडगाव शेरी येथील उद्यानापासून एक दुचाकी चोरली होती. तिचा गुन्ह्यामध्ये वापर केल्याचे समोर आले आहे. महिलेचे हत्या केल्यानंतर दोघेही जण वडगाव शेरी येथील शिवाजी उद्यानात काही वेळ थांबले. तेथेच त्यांनी चोरलेली दुचाकी सोडून दिली. त्यानंतर ते सारसबागेत गेले. सायकाळपर्यंत त्यांनी तेथैच वेळ घालविला. त्यानंतर ते झेलम एक्सप्रेसची वेळ झाल्याने सारसबागेतून पुणे स्टेशनला आले. गाडीत मोहसीन शेख यांनी त्या दोघांना ओळखले, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले़
ती महिला आली होती भाटींचा घरी
ब्रिजेश भाटीवर दिल्लीमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी महिला यापूर्वी पुण्यात ब्रिजेश भाटी यांचया घरी आली होती. तक्रारदार महिला (वय ३७) ब्रिजेश भाटीच्या घरी फेबुवारी-मार्च महिन्यात येऊन गेली होती. त्यानंतर तिने त्याच्याविरोधात बलात्काराची फिर्याद दिली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भाटीला अटक केली होती. तो दीड महिना तिहार कारागृहात होता. जून महिन्यात तो पुन्हा पुण्यात आला. गेल्या तीन-चार वर्षापासून ब्रिजेश आणि त्या महिलेचे संबंध होते, असे उपायुक्त सरदेशपांडे यांनी सांगितले. पुणे पोलिसांनी अटक केलेले बापलेक सुपारी किलर निघाल्याने त्यांनी नेमकी कोणाकडून सुपारी घेतली होती हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, ब्रिजेश भाटीची पार्श्वभूमी पहाता यामध्ये या दोघांना सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली असल्याभोवती फिरत आहे. त्यावेळी या महिलेने ब्रिजेश याला यापूर्वी तुला जगू देणार नाही, अशी धमकी दिली होती़ त्यामुळे नेमकी सुपारी कोणी दिली हे येत्या २ दिवसात अधिक तपासानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.