तडीपार असताना खुनी हल्ला; भापकर टोळीवर मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:13 AM2021-09-14T04:13:27+5:302021-09-14T04:13:27+5:30
पुणे : तडीपार असताना शहरात येऊन युवकावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भापकर टोळीवर महाराष्ट्र संघटित ...
पुणे : तडीपार असताना शहरात येऊन युवकावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भापकर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
टोळी प्रमुख आकाश दादासाहेब भापकर (वय १९, रा. कवडीपाठ, लोणी काळभोर), योगीराज ऊर्फ भैया संदीप पानसरे (वय २१, रा. माळवाडी, हडपसर) आणि अभिजित संजय सावंत (वय २३, रा. फुरसुंगी) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. आकाश भापकर हा फरार आहे.
मुंढवा येथील १६ वर्षाचा युवक त्याच्या मित्राला भेटण्यासाठी १ सप्टेंबरला त्याच्या वडिलांच्या गॅरेजवर गेला होता. त्यावेळी तेथे भैया व त्याचे दोन साथीदार आले. गाडी पुसायला कापड न दिल्यावरून त्यांनी या युवकाच्या गालावर, डोक्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
भापकर टोळीवर हडपसर परिसरात खंडणी मागणे, हत्यारासह हल्ला करणे असे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठवला. चव्हाण यांनी त्याची पडताळणी करून या प्रस्तावाला मंजुरी दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते अधिक तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मोक्काची ही ५४ वी कारवाई आहे.