'ताई, आपली 'मळमळ' समजू शकतो, पण..', मोहोळांचा पलटवार, सुप्रिया सुळेंचे उत्तर काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 05:47 PM2024-06-10T17:47:41+5:302024-06-10T17:50:13+5:30

ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहितीये

murlidhar mohol answer to supriya sule related cabinet ministry waiting a supriya sule answer | 'ताई, आपली 'मळमळ' समजू शकतो, पण..', मोहोळांचा पलटवार, सुप्रिया सुळेंचे उत्तर काय?

'ताई, आपली 'मळमळ' समजू शकतो, पण..', मोहोळांचा पलटवार, सुप्रिया सुळेंचे उत्तर काय?

किरण शिंदे

पुणे : नरेंद्र मोदींनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसोबतच ७२ मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा पार पडला. पहिल्यांदाच निवडून आलेले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे देखील मंत्री झाले. अनेक वर्षानंतर पुणे शहराला मंत्रिपद मिळाल्याने महायुतीत आनंदाचे वातावरण होतं. मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोहोळ यांच्यावर मंत्रिपदावरून खोचक टीका केली. मंत्री पद मिळालं, चांगली गोष्ट आहे.  मात्र त्याचा फायदा कंत्राटदारांना न होता सामान्य लोकांना व्हावा असं त्या म्हणाल्या. आणि यावरूनच सुप्रिया सुळे आणि मोहोळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २५ वा वर्धापन दिवस. त्यानिमित्त सुप्रिया सुळे पक्ष कार्यालयात आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. पुण्याला मंत्रिपद मिळालं, चांगली गोष्ट आहे. मात्र या मंत्रिपदाचा उपयोग कंत्राटदारांना न होता पुणेकरांना व्हावा असे त्या म्हणाल्या. पत्र पहिल्यांदाच खासदार अन मंत्री झालेल्या मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिले. ताई आपली मळमळ समजू शकतो. सामान्य कार्यकर्त्याला मंत्रीपद मिळाले हे तुमच्यासारख्या तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना पचनी पडणार नाही.. तर पुण्याचे आणि महाराष्ट्रातील मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे, असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले. 

मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट जसेच्या तसे..

सुप्रियाताई,
शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !
खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं. ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो. उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही.

Web Title: murlidhar mohol answer to supriya sule related cabinet ministry waiting a supriya sule answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.