कानसेनांसाठी साकारले ‘म्युझिक कॅफे’
By admin | Published: June 1, 2017 02:46 AM2017-06-01T02:46:54+5:302017-06-01T02:46:54+5:30
आजकालची जीवनशैली धावपळीची आणि तणावग्रस्त बनली आहे. त्यामुळे अनेक विकार माणसाची सोबत करु लागले आहेत. ताणतणाव
प्रज्ञा केळकर-सिंग /लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आजकालची जीवनशैली धावपळीची आणि तणावग्रस्त बनली आहे. त्यामुळे अनेक विकार माणसाची सोबत करु लागले आहेत. ताणतणाव आणि विकारांवर संगीत अत्यंत परिणामकारक ठरते. एखादी सुरेल धून कानावर पडली की मन प्रसन्न होते, चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. ‘कानसेन’ बनून संगीताची जादू अनुभवता येते. संगीताचा हीच परिणामकारकता लक्षात घेऊन ‘म्युझिक कॅफे’ ची संकल्पना पुण्यात लॉ कॉलेज रस्त्यावर मूर्त रुपात साकारली आहे.
संतोष घाटपांडे, सावनी घाटपांडे आणि आनंद कोल्हारकर यांनी संगीताचा आनंद आणि त्या जोडीला आयुर्वेदाचे गुणधर्म वापरुन तयार केलेले पदार्थ हा अनोखा मिलाफ ‘म्युझिक कॅफे’मध्ये पहायला मिळतो.
गेल्या ५ वर्षांपासून शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ आदी ठिकाणी म्युझिक थेरपीच्या कार्यशाळा घेतल्या जात होत्या त्याचप्रमाणे संगीत कार्यक्रम, मैैफली आयोजित केल्या जात होत्या. या काळात संगीताची परिणामकारकता ठळकपणे जाणवली. त्यातूनच ही संकल्पना नावारुपाला आली.
गर्भवती स्त्रियांच्या बाबतीतही बाळाच्या वाढीमध्ये संगीत महत्वाची भूमिका बजावते. ‘म्युझिक कॅफे’ च्या माध्यमातून शास्त्रीय संगीत ऐकायला मिळण्याबरोबरच समुपदेशनही केले जाते. त्याचप्रमाणे साऊंडप्रूफ रुममध्ये रियाझ, छोटेखानी संगीत मैफिलीही रंगवता येतात.
तणावात प्रभावी
ताणतणावाच्या जीवनशैलीमध्ये शास्त्रीय संगीतातून मिळणारी अवर्णनीय अनुभूती अनुभवण्याच्या दृष्टीने
‘म्युझिक कॅफे’ ही संकल्पना प्रभावी ठरते. परदेशात ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजली आहे. मात्र, भारताला शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा लाभलेली असूनही, ‘म्युझिक कॅफे’ बाबत जागरुकता निर्माण झालेली नाही.
संगीतातील सूर, ताल आणि
लय माधुर्य निर्माण करते. त्यातील नादमयता काळजाचा ठाव घेणारी असते. संगीताचा आनंद आणि त्या जोडीला आयुर्वेदाचे गुणधर्म वापरुन तयार केलेले पदार्थ हा अनोखा मिलाफ ताणतणाव आणि आजारांना दूर ठेवू शकतो, असे मत संतोष घाटपांडे, सावनी घाटपांडे आणि आनंद कोल्हारकर यांनी व्यक्त केले.
संगीत ऐकताना तयार होणारा मूड टिकवून ठेवण्यासाठी म्यूझिक मेन्यू खूप उपयुक्त ठरतो. त्यामुळे शारिरीक, मानसीक समाधान लाभते.
कॅफेमध्ये अनोखा ‘म्युझिक मेन्यू’ तयार करण्यात आला आहे. या मेन्यूला बंदिश, तराणा, अंतरा, सप्तक, आलाप अशी संगीताशी संबंधित नावे देण्यात आली आहेत. संगीताचा शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होत असतो.
शास्त्रीय संगीतातील विविध राग ऐकत असताना विविध प्रकारे मूड तयार होत असतो. या मूडशी संबंधित खाद्यपदार्थांनी मानसिक आणि शारीरिक लाभ होतो. त्याचमुळे शास्त्रीय संगीताला आयुर्वेदाची जोड देऊन अनोखा मेन्यू तयार करण्यात आला आहे.
या खाद्यपदार्थांनाही कलावती कॉफी, दरबारी सरबत, आसावरी ड्रिंक, चारुकेशी ताक, सारंग सरबत, मालकंस अशी नावे देऊन आगळेपण जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ज्याप्रमाणे व्यायामासाठी जिम आवश्यक असते, त्याचप्रमाणे प्रसन्नतेसाठी संगीत, असा यामागचा उद्देश आहे. संगीत ऐकल्याने तणावमुक्ती, आत्मविश्वास, ह्दयाची कार्यक्षमता, मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण, एकाग्रता, रागावर नियंत्रण, शारिरिक आणि मानसिक प्रसन्नता असे विविध फायदे होतात. कॅफेमध्ये या सर्व लाभांसाठी वेगवेगळया प्रकारचे संगीताचे सेट तयार करण्यात आले आहे.
- संतोष घाटपांडे
किशोरीताई आमोणकर, पं.भीमसेन जोशी, पं. संजीव अभ्यंकर, देवकी पंडित अशा दिग्गज गायकांच्या विविध रागांमधील बंदिशी आणि ध्वनिमुद्रण ऐकून सकारात्मकता लाभते. प्रत्येक म्युझिकल पीसमध्ये फ्रिक्वेन्सीचा बारकाईने विचार करण्यात आल्याने त्यातून मोठा परिणाम साधला जातो.
- सावनी घाटपांडे
भारतीय संगीताच्या कक्षा सातासमुद्रापार रुंदावल्या आहेत. परदेशात ‘म्युझिक कॅफे’ ही संकल्पना अनेक वर्षांपासून रुजली आहे. भारतात मात्र त्याबाबत अधिकाधिक जागृती होणे आवश्यक आहे. संगीत हा आपल्या संस्कृतीचा हा ठेवा असून आपले दैनंदिन जीवन सुरळीत करण्यास मदत करतो.
- आनंद कोल्हारकर