संगीत नाटक दुष्टचक्रात अडकले आहे : कीर्तनकार चारूदत्त आफळे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:23 PM2019-06-26T13:23:11+5:302019-06-26T13:29:54+5:30
संगीत नाटकांनी केवळ मनोरंजनाचे काम केले नाही तर भाषेसाठी आणि समाजप्रबोधनासाठी हे मोठे योगदान दिले आहे.
पुणे : संगीत नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तरी या कलाप्रकाराने महाराष्ट्राचे मन घडवले आहे. सध्या संगीत नाटक एका दुष्टचक्रामध्ये अडकले असून, संगीत नाटकाचे प्रयोग होत नाही म्हणून कलाकार मिळत नाही आणि कलाकार मिळत नाही म्हणून प्रयोग होत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ कीर्तनकार आणि रंगकर्मी चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केली.
पुणे महानगरपालिकेतर्फे चारुदत्त आफळे यांना यंदाचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त संवाद पुणे संस्थेतर्फे चारुदत्त आफळे यांचा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, रवींद्र खरे, संतोष चोरडिया, वंदन नगरकर, शुभांगी आफळे आदी उपस्थित होते.
चारुदत्त आफळे म्हणाले, संगीत नाटकांना मोठी परंपरा आहे. ती परंपरा तरुण कलाकारांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. संगीत नाटक हेच ख-या अर्थाने भविष्यात पुढे घेऊन जाणार आहे. संगीत नाटकांनी केवळ मनोरंजनाचे काम केले नाही तर भाषेसाठी आणि समाजप्रबोधनासाठी हे मोठे योगदान दिले आहे.
कीर्ती शिलेदार म्हणाल्या, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकामध्ये मराठी भाषेची अवस्था पाहिली की वाईट वाटते. परंतु याच वेळी मराठी संगीत नाटकांनी अभिजात मराठी भाषा जपली आहे. त्या माध्यमातून मराठी भाषा तरुणांपर्यंत पोहोचविली पाहिजे. तरुणांपर्यंत संगीत नाटक पोहोचले तर पुन्हा एकदा संगीत नाटकांचा सुवर्णकाळ परत येईल .
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, जेव्हा शिक्षण हे केवळ काही वगार्पुरतेच मर्यादित होते. या काळामध्ये ख-या अर्थाने समाज प्रबोधन करण्याचे काम कीर्तन आणि संगीत नाटकांनी केले. बालगंधर्व यांच्यापासून आलेला वारसा समर्थपणे पुढे नेत चारुदत्त आफळे यांनी मराठी संगीत रंगभूमी अधिक समृद्ध केली.
रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. आम्ही एकपात्री आणि भरत नाट्य मंदिर संशोधन संस्थेतर्फे यावेळी चारुदत्त आफळे यांचा सत्कार करण्यात आला.