पुणेकरांच्या ‘डीएनए’मध्येच संगीत

By admin | Published: January 13, 2017 03:18 AM2017-01-13T03:18:30+5:302017-01-13T03:18:30+5:30

‘संगीत आणि पुणं याचं एक अतूट नातं आहे. संगीताविषयी इथले कानसेन जागृत असल्याने कलाकाराला कुठं आणि

Music in Pune's DNA | पुणेकरांच्या ‘डीएनए’मध्येच संगीत

पुणेकरांच्या ‘डीएनए’मध्येच संगीत

Next

पुणे : ‘‘संगीत आणि पुणं याचं एक अतूट नातं आहे. संगीताविषयी इथले कानसेन जागृत असल्याने कलाकाराला कुठं आणि कशी दाद द्यायची हे त्यांना अचूक कळते. पुणेकरांच्या ‘डीएनए’मध्येच संगीत आहे, पुणं हे माझं दुसरं घरच आहे,’’ अशा शब्दातं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी दर्दी पुणेकरांवर स्तुतिसुमने उधळत पुण्याच्या आठवणींना उजाळा दिला.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य शासन यांच्या वतीने आयोजित पंधरावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सिटी प्राईड कोथरूड येथे रंगला. या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शिका व अभिनेत्री अपर्णा सेन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अ‍ॅवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
पुण्याविषयी बोलताना झाकीर हुसेन म्हणाले, वयाच्या सातव्या वर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सवात तबलावादन करण्याची संधी मिळाली, संगीत, त्याची साधना म्हणजे काय? या गोष्टी पुण्यात आल्यानंतर कळतात. बालगंधर्व, कुमार गंधर्व, अप्पा जळगावकर यांना मी साथसंगत केली आहे. संगीत हे पुणेकरांच्या रक्तामध्ये आहे. नाट्यसंगीताचे वातावरण पुण्यात असल्याने शास्त्रीय संगीतालाही पुणेकरांनी आपलेसे केले. उर्दू गझलचे मुशायरेही इथे ऐकले जातात, भाषा भलेही कळत नसली तरी त्यामध्येही ते समरसून जातात.
एस.डी. बर्मन यांच्या ‘डॉ. विद्या’ या चित्रपटात मी वादन केले आहे. ते म्हणजे संगीतातील देव आहेत. त्यांच्या नावाचा पुरस्काराला मी खरच पात्र आहे का नाही, हे माहीत नाही, असे सांगून आपल्या मोठेपणाचे दर्शनही त्यांनी घडविले. तसेच आजचे संगीत हे चांगले आहे. ए. आर. रेहमान, शंकर एहसान लॉय यांच्यासारखे लोक चांगले काम करत आहेत. संगीत हे दिग्दर्शक, निर्मात्यांच्या आवडीनुसार द्यावे लागते. माझ्यासाठी वेळ देणारे दिग्दर्शक, निर्माते हवे आहेत, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली.
उद्घाटन सोहळ्याला प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गौरी रामनारायण (भारत), बेनेट रतायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण) उपस्थित होते.
पिफचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी प्रास्ताविक केले. श्रीरंग गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले तर पिफचे सचिव डॉ. रवी गुप्ता यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

पिफ अध्यक्षांनी शासकीय अधिकाऱ्याला डावलले
 पिफ हा शासनाचा अधिकृत महोत्सव आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री उद्घाटन किंवा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाहीत, मात्र हा शासनाचा महोत्सव असल्याने एक तरी अधिकारी असणे अपेक्षित आहे.
 राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या पश्चिम विभागाच्या सहायक संचालक अमिता तळेकर महोत्सवाला उपस्थित होत्या, मात्र पिफचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांना व्यासपीठावर बोलवणेच टाळले.
४याविषयी डॉ. जब्बार पटेल यांना विचारले असता त्यांनी आचारसंहिता लागू झाली त्यामुळे आम्ही कोणतीच रिस्क घेतली नसल्याची सारवासारव केली.

 मला पैठणी का नाही?
झाकीर हुसेन यांचा मिश्कील सवाल

पुरस्कार सोहळ्यात अपर्णा सेन आणि सीमा देव यांना पैठणी देण्यात आली, त्यावर श्रीरंग गोडबोले यांनी जब्बार म्हणजे आदेश बांदेकर झाले आहेत, अशी मिश्कील टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. उस्ताद झाकीर हुसेन पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर आले, तेव्हा त्यांना पुणेरी पगडी आणि उपरणे देण्यात आले. त्यावर ‘मला पैठणी का नाही?’ असा सवाल त्यांनी केला आणि उपरण्यामध्येच पैठणीची पोज दिली.

उद्घाटन सोहळ्याला रसिकांची पाठ

गेल्या वर्षी पिफच्या उद्घाटन सोहळ्याला तुंडुब गर्दी झाली होती, पाय ठेवणेही मुश्कील झाले होते, यंदा मात्र रसिकांनी
पाठ फिरविल्याचे दिसून आले. खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. नोटाबंदीचा फटका महोत्सवाला बसला असल्याची कुजबुज
रंगली होती.

Web Title: Music in Pune's DNA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.