संगीताचा दर्जा खालावला; गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:06 PM2018-01-12T12:06:00+5:302018-01-12T12:08:18+5:30
‘दैैनंदिन जीवनाप्रमाणे चित्रसृष्टी आणि संगीतातही आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत संगीताचा दर्जा खालावला आहे’, अशी खंत प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
पुणे : ‘दैैनंदिन जीवनाप्रमाणे चित्रसृष्टी आणि संगीतातही आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याप्रमाणे आपणही पुढे गेले पाहिजे. मात्र, आजकाल लोकांना काय आवडते, याचा विचार करून गाणी तयार केली जातात. त्यामुळे, पूर्वीच्या तुलनेत संगीताचा दर्जा खालावला आहे’, अशी खंत प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘रसिकांची अभिरुची लक्षात घेऊन चित्रपट तयार केले जातात, गाणी लिहिली जातात. मात्र, एखाद्या कामाचा दर्जा खालावत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे चुकीचे आहे. संगीताची उंची कायम राखायची असेल तर अभिरुची आणि दर्जा यांचा समतोल साधायला हवा. त्यातूनच समाजाला चांगल्या संगीताची ओळख होईल आणि त्यांची अभिरुची बदलायला मदत होईल.’‘संगीत क्षेत्रात तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. मात्र, तंत्रज्ञान संगीतापेक्षा मोठे होणार नाही, याची काळजी गायक आणि संगीत संयोजकांनी घेतली पाहिजे. पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यास संगीताचा बाज बिघडण्याची शक्यता असते. रसिकांमध्ये संगीत साक्षरता आणण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. त्यापेक्षा संगीतातून ही प्रक्रिया सुलभपणे घडू शकते.