संगीत हे नदीसारखे प्रवाही
By admin | Published: May 6, 2017 02:11 AM2017-05-06T02:11:59+5:302017-05-06T02:11:59+5:30
भारतीय शास्त्रीय संगीताला मोठी पंरपरा असून, आधुनिकता आणि परंपरा असे द्वंद्व सुरू असताना शास्त्रीय संगीताची परंपरा जपण्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : भारतीय शास्त्रीय संगीताला मोठी पंरपरा असून, आधुनिकता आणि परंपरा असे द्वंद्व सुरू असताना शास्त्रीय संगीताची परंपरा जपण्याचे काम डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरीयल फाउंडेशन करीत आहे. संगीत, गायन हे नदीसारखे प्रवाही असते. त्यातून निखळ आनंद मिळतो, असे मत प्रसिद्ध गायिका सुहासिनी कोरटकर यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील प्रा़ रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंचवडच्या सांगीतिक चळवळीचा मानदंड असणाऱ्या डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरीयल फाउंडेशनच्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाची शानदार सुरुवात आज झाली. उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी वसंतरावांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे, गायक संजय मराठे, विश्वस्त नाना दामले, प्रभाकर लेले, नादब्रह्म परिवाराच्या प्रमुख डॉ. वंदना घांगुर्डे, युवा गायिका सावनी रवींद्र आदी उपस्थित होते. या वेळी पंडित राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे यांना डॉ. वसंतराव देशपांडे युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले.
चिंचवडच्या स्रेहाबद्दल बोलताना सुहासिनीताई म्हणाल्या, ‘‘चिंचवडबद्दल मला विशेष जवळीक आहे. येथील संगीत महोत्सवात मी गाऊन गेले आहे. रसिकता जपणारे असे हे गाव आहे. वसंतराव देशपांडे यांचीही जवळीक लाभली. त्यांची गायकी मला विशेष भावणारी आहे. फ्यूजन या आधुनिक संगीत प्रकारामुळे शास्त्रीय संगीताचे भवितव्य याविषयी चिंता व्यक्त केली जाते. मात्र, पंडित राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे यांचे गायन ऐकल्यानंतर संगीतात शास्त्रीय संगीत परंपरेचे महत्त्व किती आहे, हे लक्षात येईल. संगीतातील परंपरा आजची तरुण पिढीही आश्वासकपणे पुढे नेत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. शास्त्रीय संगीत हे नदीच्या गुणधर्मानुसार प्रवाहीपणे पुढे जात आहे.’’
डॉ. घांगुर्डे प्रास्ताविक भाषणात म्हणाले, ‘‘डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरीयल फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संगीत महोत्सवाचे यंदाचे तिसावे वर्ष आहे. वार्षिक संगीत महोत्सव, दिवाळी पहाट, युवा कलावंतांच्या मुलाखती असे विविध उपक्रम राबविले जातात. पिंपरी-चिंचवडमध्ये संगीत परंपरा रूजविण्याचे सांस्कृतिक चळवळीत भर टाकण्याचे काम फाउंडेशनने केले आहे. याचा विशेष आनंद फाउंडेशनला आहे. कलावंत आणि रसिक यांच्यामुळे महोत्सवाचा लौकिक उत्तरोत्तर वाढत आहे.’’
विनिता रायकर यांनी सूत्रसंचालन केले. अरुण चितळे यांनी आभार मानले.
ग्रीष्म ऋतू : स्वरवसंतबहारचा अनुभव
सध्या ग्रीष्म ऋतू सुरू आहे. अंगाची लाहीही करणारे ऊन, उकाड्याने जीवाची काहीली होत आहे. अशातच आज संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. प्रसिद्ध गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे, युवा गायक भाग्येश मराठे, प्रथमेश लघाटे यांच्या गायनाने ग्रीष्मात ‘स्वरवसंतबहार’चा अनुभव मिळाला.
महोत्सवात आज
शनिवारी आदित्य मोडक, गंधार देशपांडे यांचे गायन, स्वीकार कट्टी यांचे सतारवादन, अभिषेक बोरकर यांचे सरोदवादन, आदित्य ओक यांचे संवादिनीवादन, सुनील अवचट यांचे बासरीवादन, स्वरांगी मराठे, शामिका भिडे यांचे सहगायन सादर होणार आहे. रविवारी महोत्सवाची सांगता होणार असून, नादब्रह्म, पुणे निर्मित ‘संगीत कट्यार काळजात घुसली’चा प्रयोग सादर होईल.