आत्ममग्नतेची संगीत मैफल ही आनंदयात्राच!
By admin | Published: June 29, 2017 03:26 AM2017-06-29T03:26:01+5:302017-06-29T03:26:01+5:30
व्हायोलिनवादनामध्ये आत्ममग्नतेचा आनंद, रसिकांचा आनंद आणि दिग्गज कलाकारांना ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्याचा आनंद
व्हायोलिनवादनामध्ये आत्ममग्नतेचा आनंद, रसिकांचा आनंद आणि दिग्गज कलाकारांना ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्याचा आनंद ही अनोखी आनंदयात्राच असते. शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकार आपल्यात नसले तरी त्यांनी आपल्या नाममुद्रेसह स्वरमंदिरे उभी केली आहेत. प्रत्येक मैफल हा नवीन जन्म, नवी साधना आणि नवा विचार असतो. मैफलींमध्ये रंगून जाताना आयुष्य त्रोटक आहे, असे वाटू लागते. नव्या पिढीने ही संगीतसाधना आत्मसात करून परिपूर्णतेच्या दिशेने प्रवास करावा, असे मत ज्येष्ठ व्हायोलिनवादक
पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त व्यक्त केले.
व्हायोलिनवादनाची प्रत्येक मैफल हा नवीन जन्म, नवी साधना आणि नवा विचार असतो. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये रंगून जाताना आयुष्य त्रोटक आहे, असे वाटू लागते. प्रत्येक मैफलीतून एकमेवाद्वितीय आनंद मिळत असतो. त्यामुळे त्यामध्ये डावे-उजवे असे ठरवता येत नाही. मैफलीचा आनंद हे कलावंत आणि रसिकांमधील अदृश्य तरीही मनस्वी आनंद देणारा झरा असतो. गाण्याचा आनंद घेणारा, जाणकार बुद्धिजीवी रसिकवर्ग समोर असेल, तर वादन अधिकच खुलते.
मी देशाप्रमाणे परदेशातही व्हायोलिनवादनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. पुण्यामध्ये अनेक संगीत मैफली होतात; मात्र परदेशातील रसिकांना अशा मैफलींचा आनंद अभावानेच घेता येतो. त्यामुळे तेथील मैफली कायमच रंगतात.
व्हायोलिनवादनाचे बाळकडू मला घरातूनच मिळाले. माझे वडील गुरुवर्य बाळकृष्ण उपाध्ये यांच्याकडून मी व्हायोलिनचे धडे गिरवले. वडिलांनी १९५१ साली व्हायोलिन अॅकेडमीची सुरुवात केली. मी गेल्या ४५ वर्षांपासून वादन करत आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली संधी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ, बासरीवादक पं. रोणू मुजूमदार, दया शंकर, उस्ताद दिलशाद खाँ या कलावंतांसमवेत रंगलेली जुगलबंदी कायम लक्षात राहणारी आहे. शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकार आपल्यात नसले तरी त्यांनी आपल्या नाममुद्रेसह स्वरमंदिरे उभी केली आहेत.
शहरी भागात शास्त्रीय संगीताच्या मैफली सातत्याने होत असल्याने कानसेन तयार होतात. ग्रामीण भागातही संगीताचे जाणकार असतात. केवळ संगीत त्यांच्यापर्यंत पोचण्याची आवश्यकता असते. त्यामुळेच मी अनेक गायकांसह सोलापूर, कोल्हापूर, अमरावती अशा ठिकाणी जाऊन मैफली आयोजित करण्याचा प्रयत्न करत असतो.
व्हायोलिनवादनामध्ये आत्ममग्नतेचा आनंद, रसिकांचा आनंद आणि दिग्गज कलाकारांना ‘याचि देहि, याचि डोळा’ अनुभवण्याचा आनंद ही अनोखी आनंदयात्राच असते. शास्त्रीय संगीताने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. परदेशामध्ये संगीत हा विषय शिक्षणात अंतर्भूत करण्यात आला आहे. आपल्याकडे अद्याप ती यंत्रणा विकसित झालेली नाही. मुलांमध्ये उपजतच संगीताची आवड असते. ही अभिरुची वृद्धिंगत करायची असेल तर मुलांवर लहानपणापासून संगीताचे संस्कार करायला हवेत. त्यासाठी शाळा-शाळांमध्ये जाऊन ‘म्युझिक अॅप्रिसिएशन कोर्स’च्या माध्यमातून संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आमचा प्रयत्न
सुरू आहे.
संगीत हे मन:शांतीसाठी प्रभावी माध्यम आहे. संगीतामुळे मनावरील ताण नाहीसा होतो आणि प्रसन्नता लाभते. शास्त्रीय संगीतामध्ये रियाझाला अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र, किती तास रियाझ केला जातो, यापेक्षा किती डोळसपणे आणि योग्य दिशेने रियाझ सुरू आहे का, याला महत्त्व असते. चुकीच्या दिशेने होणारा रियाझ निरुपयोगी ठरतो.
गायन आणि वादनाच्या रियाझासाठी गुरूला योग्य विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला योग्य गुरू मिळाल्यास जडणघडणीचा प्रवास आनंददायी असतो. आजकाल तरुण मोठ्या संख्येने व्हायोलिनवादनाकडे वळू लागले आहेत, हे आशादायी चित्र आहे. व्हायोलिन हे मानवी स्वराच्या जवळ जाणारे वाद्य आहे. त्यामुळे व्हायोलिनवर ठुमरी, तराणा, जोडझाला, धून असे वैविध्यपूर्ण वादन करता येते.
१०० व्हायोलिन एकत्र वाजवले तरी गोंगाट न होता सुरेल वातावरण निर्माण होते. व्हायोलिनच्या पूर्णत्वाकडे जायला पुढील ५० वर्षे लागतील, असेही ते म्हणाले.