संगीत संगोष्टी या दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:49+5:302021-03-08T04:12:49+5:30
‘स्वरमंडल फाऊंडेशन’ व भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने उत्तर भारतीय व ...
‘स्वरमंडल फाऊंडेशन’ व भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ‘संगीत संगोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा दोन दिवसीय कार्यक्रम कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. संगीताचा प्रचार, प्रसार या उद्देशाने नव्यानेच सुरू झालेल्या ‘स्वरमंडल फाऊंडेशन’चा हा शुभारंभाचा कार्यक्रम होता.
पहिल्या दिवशी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका शाल्मली जोशी यांच्या गायकीने रंग भरले. त्यांनी जोड राग ‘मालीगौरा’ने गायनाची सुरुवात केली. राग पुरिया व राग गौरी यांचे मिश्रण असलेल्या या रागात विलंबित तीन तालात ‘सरस भेद जुग सरस...’ ही रचना तर ‘तू हर हार रब समान..’ ही द्रुत बंदिश पेश केली. मैफलीचा समारोप त्यांनी ‘खेले कान्हाई...’ या होरीने केला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात शास्त्रीय गायक आदित्य खांडवे यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मुलतानीने मैफलीची सुरुवात करत विलंबित तीनतालात ‘हां रे मन काहे को सोच करे रे...’, दृत एकतालमध्ये ‘कुंजन में रचो रास...’ या बंदिशी सादर केल्या. त्यानंतर राग भूप सादर करत विलंबित तिलवाडा ‘जब मै जानी तेहारी बात...’ या रचनेसह पेश केला. त्यानंतर दृत तीनतालात ‘खेलत अत धूमधाम..’ ही बंदिश सादर केली. त्यांनी मैफलीचा समारोप राग बसंतमध्ये मध्य लय तीनतालातील बंदिश व तरानाने केला. त्यानंतर पं. अनंत तेरदाल यांनी कन्नड रचना पेश केल्या. त्यांनी प्रसिद्ध कन्नड अभंग ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा...’, ‘निन्न नोडी धन्य नादे ना..’, ‘इंदू एनगे श्री गोविंदा..’, ‘नीने अनाथ बंधो..’, हरे बेंकटा शैल वल्लभा...’, ‘करूणिसो रंगा करूणिसो...’, ‘कशी मोहिनी घातले गुरूने...’, ‘कंगळीड्यातको कावेरी रंगन नोडदा...’ हे कन्नड अभंग सादर करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता केली.