तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या : कौशल इनामदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 08:34 PM2018-08-09T20:34:41+5:302018-08-09T20:35:11+5:30
संगीत क्षेत्र प्रचंड व्यापक असून त्यावर आजचे युग हे स्पर्धात्मक आहे. यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मेहनत हाच एक सर्वोत्तम पर्याय आहे : कौशल इनामदार
पुणे : चित्रपट, नाटक, जाहिरात, टेलीव्हिजन यासाठी आवश्यक संगीत हे एक विशेष काम झाले आहे. या गोष्टींचे शास्त्र व्यवस्थितपणे शिकवणे गरजेचे आहे. यासाठी उपयोजित संगीत याविषयीची कार्यशाळा विद्यापीठांमध्ये घ्यायला हवी. अभिजात, शास्त्रीय संगीत शिकणा-या विद्यार्थ्यांना देखील संगीताकडे बघण्याचा दृष्टीकोन अशा कार्यशाळांमधून मिळणार आहे. संगीतावर तंत्रज्ञानाचा परिणाम झाला आहे. आज कोणत्याही प्रकारचे संगीत एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध होते. तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या आहेत, असे मत संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केले.
उपयोजित संगीत या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कोथरुड येथील भारती विद्यापीठ स्कूल आॅफ परफार्मिंग आर्टस्च्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी केंद्राचे संचालक शारंगधर साठे, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संगीताची उत्पत्ती कशी झाली?, आदिम संगीत, लोकसंगीत, जनसंगीत, कला संगीत अशा विविध संगीताविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्रातील आदिम संगीतात कशाप्रकारे साम्य आहे. संगीत आणि संस्कृती यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे?, कवितेला चाल लावताना कोणत्या घटकांचा वापर केला पाहिजे. एखाद्या शब्दांना चाल कशी लावली पाहिजे किंवा चालींमध्ये शब्द कशाप्रकारे बसविले पाहिजेत. अशाप्रकारे कार्यशाळेतून संगीताविषयी माहिती देत संगीतकार कौशल इनामदार यांनी विद्यार्थ्यांसमोर उपयोजित संगीताचे विविध पैलू उलगडले.
कौशल इनामदार म्हणाले, मदन मोहन यांनी गाण्यातील शब्द त्याचा अर्थ आणि त्यासाठी योजलेली चाल हे समीकरण अत्यंत सुंदर आहे. त्यामुळे हे गीत आजही लोकांच्या स्मरणात राहिले आहे. पूर्वीच्या गीतांच्या चालींमधील स्वरसमूह मोठे होते, त्यामध्ये एकप्रकारची सूत्रबद्धता होती. त्यामुळे ती गाणी चिरकाल स्मरणात राहिली आहेत.