संगीत नाटकात सुरांबरोबरच शब्दांकडेही लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:35+5:302021-06-29T04:08:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : छोटा गंधर्व यांच्याकडून नाट्यसंगीतातील बारकावे, हरकती शिकण्याचे भाग्य लाभले. शिष्याला मार्गदर्शन करण्याची त्यांची वेगळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छोटा गंधर्व यांच्याकडून नाट्यसंगीतातील बारकावे, हरकती शिकण्याचे भाग्य लाभले. शिष्याला मार्गदर्शन करण्याची त्यांची वेगळी धाटणी होती. ते शिष्याला समोर बसवून त्याच्याकडून घोकंपट्टी करवून न घेता गायनातील बारकावे कसे उचलावे, ही दृष्टी शिष्याला देणे महत्वाचे मानत, अशा शब्दांत स्वरराज छोटा गंधर्व यांच्या आठवणींना उजाळा देत ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांनी ‘संगीत नाटक सादर करताना सुरांबरोबरच शब्दांकडेही अतिशय कटाक्षाने लक्ष दिले जावे’ असा सल्ला नवोदितांना दिला.
स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणेतर्फे ज्येष्ठ ऑर्गनवादक कै. चंद्रशेखर देशपांडे स्मृती राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रातिनिधीक स्वरूपात पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरण ज्येष्ठ गायक अभिनेत्री मधुवंती दांडेकर आणि भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कुलकर्णी बोलत होत्या. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चारुशीला केळकर, उपाध्यक्षा सुचेता अवचट, दुर्मिळ वस्तूंचे संग्राहक दशरथ वाणी उपस्थित होते.
नाट्यसंगीत ही महाराष्ट्रातील सकस कला आहे. नाट्यसंगीताची आवड पुढील पिढीकडून जोपासली जावी. कलावंत आणि रसिकांपर्यंत उत्तम गोष्टी पोहोचविल्या तर अशा अभिजात कलांची जपणूक होण्यास मदतच होईल. भविष्यकाळात संगीत नाटके रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.
सुरुवातीस स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान आयोजित नाट्यगीत गायन स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका चारुशीला केळकर यांनी विषद केली. सुचेता अवचट यांनी आभार मानले.
-------------
रंगली नाट्यसंगीताची छोटेखानी मैफल
विजेत्या स्पर्धकांनी स्पर्धेदरम्यान सादर केलेल्या नाट्यगीतांची झलक या वेळी ऐकविली. उपस्थितांच्या प्रेमळ आग्रहाखातर मेधा कुलकर्णी यांनी छोटा गंधर्व यांनी संगीत दिलेले ‘पारिजात मनी फुलला’ हे नाट्यगीत सादर करून उपस्थितांना सुखद धक्का दिला. प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा गायक अभिनेत्री सुचेता अवचट यांनी संगीत सुवर्णतुला नाटकातील उजळीत जग मंगलमय हे पद सादर केले तर मैफलीची सांगता मधुवंती दांडेकर यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज रचित ‘आहे भगवद्गीता पूर्ण अमृत सरिता’ या अभंगाने केली.
----------------------------------------