मुस्लिम बांधवांनी केली मानाच्या बाप्पांची आरती
By admin | Published: September 17, 2016 01:26 AM2016-09-17T01:26:58+5:302016-09-17T01:26:58+5:30
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, हाच एकात्मतेचा संदेश घेऊन पुणे शहर विघ्नहर्ता न्यास यांच्या पुढाकारातून बेलबाग चौकात
पुणे : राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, हाच एकात्मतेचा संदेश घेऊन पुणे शहर विघ्नहर्ता न्यास यांच्या पुढाकारातून बेलबाग चौकात मानाच्या पाचही गणपतींची आरती मुस्लिम बांधवांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात या उपक्रमाचे स्वागत केले.
या वेळी या बांधवांनी मानाच्या पहिल्या दोन गणपतींच्या पालख्यांना काही अंतर खांदाही दिला. मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य यातून करण्यात येते आहे.
डॉक्टर मिलिंद भोई, युसूफभाई चावीवाले, सुप्रसिद्ध गायक इक्बाल दरबार, शबाना देशपांडे, मुश्ताक पटेल, सज्जाद पटेल, मारूफ पटेल उपस्थित होते. या शिवाय दि मुस्लिम औकाफ वेलफेअर ट्रस्ट पुण्याच्या वतीने यंदाच्या वर्षीदेखील बेलबाग चौक लक्ष्मीरोड येथे विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून अहोरात्र झटणारे पोलीसबांधव, डॉक्टर्स, पत्रकार बांधव, स्वयंसेवक, पुणे मनपा व विद्युत विभागाचे सेवक यांना शुक्रवारी सकाळी बेलबाग चौक येथे शिरखुर्मा व सुका मेव्याचे वाटप ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.