कोरोनाच्या दहशतीत पण मुस्लिम युवकाने 'माणुसकी'चा धर्म जपला; बेवारस प्रेताला अखेरचा 'मार्ग' दाखविला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 03:30 PM2020-04-09T15:30:41+5:302020-04-09T15:37:23+5:30

बेवारस प्रेत नेण्यास सरकारी रुग्णवाहिकेचा नकार ; मृतदेह तीन तास फुटपाथवरच पडून;

Muslim youth embraces humanity in Corona terror | कोरोनाच्या दहशतीत पण मुस्लिम युवकाने 'माणुसकी'चा धर्म जपला; बेवारस प्रेताला अखेरचा 'मार्ग' दाखविला

कोरोनाच्या दहशतीत पण मुस्लिम युवकाने 'माणुसकी'चा धर्म जपला; बेवारस प्रेताला अखेरचा 'मार्ग' दाखविला

googlenewsNext
ठळक मुद्देखासगी रुग्णवाहिकेच्या मुस्लिम चालकाने घडविले माणुसकीच्या धर्माचे दर्शन..

कल्याणराव आवताडे- 
धायरी: माणसाने माणूस जोडत राहावा हीच माणुसकीची शिकवण सर्व धर्मांनी, साधू संतांनी, महात्म्यांनी जगाला दिली. तीच शिकवण जपण्यासाठी कोरोना संसर्गजन्य विषाणू मृत्यूतांडव घडवत असताना देखील काहीजण जीवाची बाजी लावत दिवसरात्र निधड्या छातीने त्याचा सामना करत आहे. एकीकडे ही प्रेरणादायी अवस्था असताना मात्र, दुसरीकडे माणसाला माणूस म्हणून विचारत नाही अशी पण एका दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बेवारस वयोवृद्धाचा मृतदेह नेण्यास सरकारी रुग्णवाहिकेने नकार दिला. खरंतर मरणानंतरही यातनांनी त्या जीवाची पाठ सोडली नाही असेच म्हणावे लागेल. मात्र, याचवेळी खासगी रुग्णवाहिकेच्या मुस्लिम चालकाने ही जबाबदारी खांद्यावर घेत माणुसकी हाच धर्म जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे अधोरेखित केले.
 बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील फुटपाथवर एक बेवारस व्यक्ती निपचित पडून असल्याचा फोन कंट्रोल रूमला आला. सेनापती बापट रस्ता हा चतुश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याने कर्तव्यावर हजर असणारे पोलीस नाईक अमोल भिसे व पोलीस शिपाई अमोल गावकरे यांनी तातडीने घटनेच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता एक वयोवृद्ध फुटपाथवर निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने १०८ नंबरला फोन करून सरकारी रुग्णवाहिका मागविली. त्यानंतर सरकारी रुग्णवाहिकेत डॉ. अश्विनी देशपांडे त्या ठिकाणी आल्या. डॉ. देशपांडे यांनी त्या बेवारस वृद्धास तपासले असता तो मयत झाल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी त्या मयत वृद्धास पोस्टमार्टमसाठी ससून हॉस्पिटलला सोडण्याची विनंती केली असता समजा तो वयोवृद्ध कोरोनाबाधित असेल तर तसेच आमच्याकडे पीपीई किट नसल्याने तुम्ही खासगी रुग्णवाहिका बोलवा, असे सांगत थेट त्या मयत वृद्धास घेऊन जाण्यास नकार दिला. पोलिसांनी सरकारी रुग्णवाहिकेच्या संबंधित आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी डॉ. वेद्ण्यास मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही आम्ही बेवारस बॉडी नेऊ शकत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी बऱ्याच खासगी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती, त्यावेळी त्यांनी पाषाण येथील खासगी रुग्णवाहिका चालक गब्बर शेख यांना संपर्क केला असता त्यांनी तात्काळ येऊन त्या मृत बेवारस प्रेतास ससून रुग्णालयात नेले. दरम्यान त्या बेवारस वयोवृध्दाचा मृतदेह तब्बल तीन तास फुटपाथवर पडून होता.  

खासगी रुग्णवाहिकेच्या मुस्लिम चालकाने घडविले माणुसकीच्या धर्माचे दर्शन..
धर्म, रुढी, प्रथा-परंपरा या विषयांवरून सोशल मीडियात बराच खल सुरू आहे. त्यात जो-तो आपल्या धमार्ची श्रेष्ठता पटवून देतोय. परंतु बुधवारी खासगी रुग्णवाहिकेचा चालक गब्बार महम्मद शेख यांनी माणुसकीच्या धर्माचे दर्शन घडवलं. पाषाण येथील जय भवानी ट्रस्टच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून गेल्या १५ वर्षांपासून रुग्णांची सेवा करणाऱ्या गफूर भाईने त्या वयोवृद्ध बेवारस प्रेतास कोणतेही सुरक्षेतेची साधने नसताना उचलून रुग्णवाहिकेत पोस्टमार्टमसाठी घेऊन गेले. एवढ्यावरच न थांबता ते पहाटे चार वाजेपर्यंत ससूनमध्ये थांबले. त्या बेवारस वृद्धाचा रिपोर्ट 'निगेटिव्ह' आल्यानंतरच ते घरी गेले. पोलीस नाईक अमोल भिसे व पोलीस कर्मचारी अमोल गावकरे हे बुधवारी सकाळी ९ वाजता कर्तव्यावर आले होते. गुरुवारी पहाटे चार वाजता त्या बेवारस वृद्धाचा पोस्टमार्टम झाल्यांनतर ते घरी गेले. उपासमारी व अशक्तपणामुळे त्या वृद्धाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवाल आल्याचे पोलीस नाईक भिसे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

Web Title: Muslim youth embraces humanity in Corona terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.