चोऱ्यांबाबत सजग राहणे आवश्यक
By admin | Published: February 20, 2016 12:59 AM2016-02-20T00:59:26+5:302016-02-20T00:59:26+5:30
पुरंदर तालुक्यात सध्या भुरट्या चोऱ्या, दागिने पळविणे, दरोडे घालणे, वाटमारी या प्रकारात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर चौकाचौकात रोडसख्याहरींची संख्या वाढली आहे
पुरंदर तालुक्यात सध्या भुरट्या चोऱ्या, दागिने पळविणे, दरोडे घालणे, वाटमारी या प्रकारात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर चौकाचौकात रोडसख्याहरींची संख्या वाढली आहे. हा सगळा प्रकार दिसत असतानाही नागरिक सजग नाहीत. पोलिसांचे लक्ष नाही असेच दिसत आहे. कित्येक घटनांमध्ये पोलिसांकडे तक्रारच दिल्याचे दिसत नाही.
सासवडमध्ये गेल्या आठवड्यातच दरोड्याचे दोन प्रकार घडले. वीर, नारायणपूर, जेजुरी इ. तीर्थस्थानी दागिनेचोरीचे प्रकार नित्यच घडत आहेत. सासवडमध्ये एका रात्रीत चार घरफोड्या झाल्या. परंतु चोरीला गेलेला एक-दोन हजारांचा आहे, किरकोळ आहे, असे सांगत नागरिकांनी पोलिस स्टेशनला जाणेच टाळले. असे का होते? हा खरा प्रश्न आहे.
लोकांना पोलिसांकडे जाण्याची भीती वाटते का, याचा विचार होणे गरजेचे आहे. छोट्या चोऱ्यांतूनच मोठे दरोडे पडतात. मग मात्र सगळे जागे होतात; पण साधी चोरी झाली, तर गप्प बसतात, हे कोडे आहे. पोलिसांकडे तक्रार नाही. .
काही वर्षांपूर्वी गावात कुठेही दरोडा पडला तर गावातील तरुण एकत्र येऊन गस्त घालीत, पण आता नागरिकांची गस्त हा प्रकारच दिसत नाही. पोलिसांची संख्या अपुरी असल्याचे कारण नेहमीच सांगितले जाते. गावातील तरुणांनी एकत्र येऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन केले जाते. पण या दलाच्या ओळखपत्राचा काय वापर होतो हे पाहणे आवश्यक आहे.