चुकीच्या प्रस्तावांनाही मूक संमती

By Admin | Published: June 26, 2016 04:47 AM2016-06-26T04:47:51+5:302016-06-26T04:47:51+5:30

आर्थिक प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार असलेल्या स्थायी समितीत भोंगळ कारभार होत असून, त्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. प्रत्येक प्रस्तावावर अनुमोदक, सूचकांची स्वाक्षरी असते.

Mute consent for wrong proposals | चुकीच्या प्रस्तावांनाही मूक संमती

चुकीच्या प्रस्तावांनाही मूक संमती

googlenewsNext

पिंपरी : आर्थिक प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार असलेल्या स्थायी समितीत भोंगळ कारभार होत असून, त्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. प्रत्येक प्रस्तावावर अनुमोदक, सूचकांची स्वाक्षरी असते. अनेकदा अनुमोदक, सूचक बारकाईने प्रस्ताव न वाचता स्वाक्षऱ्या करतात. त्यांना काही लक्षात येत नाही, असे गृहित धरून सूचक, अनुमोदकांची निवड करून काही मुरब्बी मंडळी आपले इप्सित साध्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्थायी समितीचे प्रस्ताव अनेकदा वादग्रस्त ठरतात. स्थायी समितीने मंजूर केलेले प्रस्तावसुद्धा शासनाकडून विखंडित केल्याचे प्रकार घडले आहेत. ऐनवेळचे विषय सभागृहात विषय पटलावर घेण्याची कायदेशीर तरतुद आहे. त्या तरतुदीचा अनेकदा गैरफायदा घेतला जातो. अगोदर कसलीही पूर्वकल्पना न देता, अचानक ऐनवेळचा प्रस्ताव पुढे आणून त्यावर अनुमोदक, सूचक म्हणुन सह्या करण्यास सांगितले जाते. एखादा विषय वादग्रस्त होऊन अडचण निर्माण झाल्यास बेफिकीर वृत्तीने स्वाक्षरी करणे सदस्यांना महागात पडू शकते. स्थायी समितीत अनुमोदक आणि सूचक म्हणून ज्यांच्या स्वाक्षरी घेतल्या जातात, त्यामध्ये महिला सदस्यांचे प्रमाण अधिक आहे. विषयपत्रिकेवर २० विषय असतील, तर निम्म्यापेक्षा अधिक प्रस्तावांवर महिला सदस्यांच्या स्वाक्षऱ्या पाहावयास मिळतात.
एखादा ठराव मंजूर केल्यानतर तो रद्द करण्याची नामुष्की ओढवणे, ही स्थायी समितीच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचविणारी बाब आहे. महापालिकेचे कामकाज जसे विशिष्ट नगरसेवक त्यांच्या मर्जीप्रमाणे चालवतात, तशाच पद्धतीने स्थायी समितीचा कारभारही काही विशिष्ट लोकांच्या हाती आहे. काही मुरब्बी सदस्य त्यांना हव्या त्या पद्धतीने प्रस्ताव स्थायी समितीपुढे आणतात. बिनबोभाट मंजूर करून घेतात. चुकीच्या प्रस्तावांबद्दल नागरिकांमध्ये चर्चा होत असेल, तर ज्यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केल्या, त्यांनी त्याबद्दल योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे. वेळीच अशा गैरप्रकारांना आळा घालण्यास त्यांनीच पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
(प्रतिनिधी)

विरोधी पक्ष सदस्यांचेही मौन
समिती सदस्यांनाच अनुमोदक, सूचक होण्याचे अधिकार असतात. सूचक म्हणजे ज्याने विषय सूचित केला, ज्याने त्या विषयाला अनुमोदन दिले, तो सदस्य अनुमोदक. परंतु, अनेकदा आपला त्या विषयाशी काही संबंध नाही, असे सांगून सदस्य जबाबदारी झटकतात. स्थायी समितीत काही चुकीचे होत असेल, तर ते निदर्शनास आणून देण्याचे काम समितीत असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी करणे अपेक्षित असते. ज्या वेळी प्रस्तावाला मंजुरी मिळते, त्या वेळी असे सदस्य काहीच बोलत नाहीत.

ऐनवेळचे विषय अधिक
विषयपत्रिकेवरील विषयांपेक्षा ऐनवेळचे विषय अधिक संख्येने स्थायी समितीपुढे येत असतात. ऐनवेळचे प्रस्ताव कोणते असावेत, याचे निकष ठरलेले असूनही असे प्रकार घडतात. त्यामागे काही तरी गडबड, घोटाळा असल्याचा संशय निर्माण होतो. मनासारखे,मर्जीतल्या व्यक्तींचे प्रस्ताव स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर आल्यास अगोदरच विरोधक सावध होतील. प्रस्तावाला विरोध होऊन रद्द करण्याची वेळ येईल. हे सर्व टाळण्यासाठी ऐनवेळचे प्रस्ताव ठेवून सरळ सरळ डोळ्यांत धूळफेक केली जात आहे.

Web Title: Mute consent for wrong proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.